अहिल्यानगरमध्ये दररोज १५० ते १५५ टन कचऱ्याचे संकलन
नागरिकांनी सतर्क राहिल्यास शहर स्वच्छ सुंदर होण्यास मदत
अहिल्यानगरमध्ये घंटागाड्याच्या आणि सफाई कर्मचाऱ्याच्या मदतीने दररोज १५० ते १५५ टन कचऱ्याचे संकलन होते. हा कचरा शहराजवळच्या बुरुडगावच्या कचरा डेपोत संकलित केला जातो. तेथे कचऱ्यावर प्रक्रिया करून कंपोस्ट खत निर्मिती केली जाते. या प्रकल्पात महिन्याला सुमारे ३०० टन खत निर्मिती होते. कचरा संकलन आणि खतनिर्मितीचे काम मनपाने ठेकेदार संस्थेला दिले आहे. घंटागाड्यांच्या माध्यमातून कचरा संकलन होत असल्याने शहर कचरा कुंडीमुक्त झाले आहे. शहरात दररोज ६५ ते ७० घंटागाड्यांचे माध्यमातून घरोघरी जाऊन कचऱ्याचे संकलन केले जाते. गेल्या काही दिवसांपासून कचरा संकलनासाठी दारात वाहन येत असले तरी शहरातील बहुतांश नागरिक रात्री अपरात्री ओढे-नाले, मोकळी जागा किंवा रस्त्यांवर कचरा फेकून देतात. यामध्ये ओल्या कचऱ्याचा समावेश असेल तर त्याची लगेच दुर्गंधी पसरले आणि त्याठिकाणी डुक्कर आणि कुत्र्याचा वावर मोठ्या प्रमाणावर होतो परिणामी बऱ्याच वेळा काही खाण्यासाठी मिळेल या हेतूने कचऱ्या भोवती जमणारी कुत्री नागरिकांवर हल्ला करतात. त्यापेक्षा नागरिकांनी ओला आणि सुका कचरा वेगळा करून दिल्यास त्यातून मोठ्या प्रमाणावर कंपोस्ट निर्मिती होऊ शकते. सध्या अहिल्यानगर मध्ये दर महिन्याला ३०० कंपोस्ट निर्मिती होत असते. नागरिकांनी कचरा विभागणी करण्याकडे जर जाणीवपूर्वक लक्ष दिले तर कंपोस्ट खताच्या प्रमाणात वाढ होऊन कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट त्यामुळे शहरात स्वच्छता आणि कंपोस्ट खताच्या निर्मितीतून महानगरपालिकेला मिळणारे उत्पन्न आणि या उत्पन्नातून शहराच्या विकासाला लागणार हातभार असे सुरळीत चक्र निर्माण होऊ शकते. प्लॅस्टिकच्या अतिवापरामुळे आणि जागोजागी प्लास्टिक फेकले जात असल्याने जमिनीचा पोत बिघडत चालल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्यामुळे कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यावर भर देणे आणि तसे न करणाऱ्यावर कडक कारवाई करणे या दोन पर्यायावर भर दिल्यास अहिल्यानगर शहर स्वच्छ आणि सुंदर होण्यास नक्कीच मदत होईल. घड्यावर कचरा फेकणाऱ्यांवर मनपाच्या स्वच्छता निरीक्षकांनी कडक कारवाई करणे गरजेचे आहे.