नक्षलवाद दोन वर्षांत संपवू : अमित शहा यांचे वक्तव्य

नक्षलविरोधी मोहिमेची रणनीती आणि विविध विकास योजनांवर विचारमंथन

नक्षलवादामुळे मानवी हक्कांचे सर्वाधिक उल्लंघन होते असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सुरक्षा दलांनी डाव्या हिंसाचाराविरोधात आता बचावात्मक पवित्रा सोडून देत आक्रमकपणे कारवाई करायला सुरुवात केली असल्याचे नमूद केले. ते नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये बोलत होते. डाव्या हिंसाचाराने पीडित असलेल्या सर्व राज्यांतील नक्षलवादाचा मार्च २०२६ च्या अखेरपर्यंत बीमोड करण्यासाठी विविध राज्ये कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
“आता नक्षलग्रस्त भागातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ झाली असून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या भागांमध्ये ७० टक्क्यांपर्यंत मतदानाची नोंद झाली होती. याआधी हेच प्रमाण शून्य टक्के एवढे होते,” असेही शहा यांनी स्पष्ट केले. “ईशान्येकडील राज्ये, जम्मू- काश्मीर आणि डाव्या हिंसाचारानेग्रस्त असलेल्या अन्य राज्यांतील जवळपास तेरा हजारांपेक्षाही अधिक लोक हे हिंसाचाराचा त्याग करून मुख्य प्रवाहामध्ये आले आहेत. अनेक युवकांनी नक्षलवादी चळवळीला सोडचिठ्ठी देत शास्त्रत्याग केला असून ही मंडळी आता मुख्य प्रवाहामध्ये आली आहेत. सर्वच राज्यांनी या युवकांना लाभ देण्यासाठी पुनर्वसन योजना तयार केल्या आहेत,” असे शहांनी नमूद केले. या बैठकीमध्ये नक्षलविरोधी मोहिमेची रणनीती आणि विविध विकास योजनांवर देखील विचारमंथन करण्यात आले. नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आता सर्वच हिंसाचारग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी जोराचा धक्का द्यायला हवा तसेच राज्यातील विकास कामांचा देखील त्यांनी आढावा घ्यावा असे आवाहन शहा यांच्याकडून यावेळी करण्यात आले. आजच्या बैठकीला छत्तीसगड, ओडिशा, तेलंगण आणि महाराष्ट्रासह अन्य राज्यांचे मुख्यमंत्री, ज्येष्ठ मंत्री आणि अन्य वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. एकूणच नक्षलग्रस्त भागातील जनतेला आणि या नक्षलवादी गटांमध्ये सामील झालेल्याना सुद्धा सर्वसमावेशक आणि भयमुक्त आयुष्य जगण्यासाठी गरजेची आणि अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यावर आपला भर असल्याचे त्यांनी सांगितले.