तंत्रज्ञानाच्या युगात वाचन संस्कृती सरस- डॉ. अमोल बागुल
वाचन संकल्प महाराष्ट्राचा, अंतर्गत जिल्हा वाचनालयात दुर्मिळ विश्वकोश प्रदर्शनाचे उद्घाटन
नगर – प्रत्येकाच्या हाती आलेला मोबाईल व त्यामधून होणार्या तंत्रज्ञानाच्या भडीमारातून मानवी मने आत्मकेंद्रित होत आहेत. मानवी संवेदना ,कल्पनाशक्ती वृद्धिंगत करण्यासाठी वाचनाशिवाय पर्याय नसून वाचनालय व त्यातील ग्रंथ संपदा तंत्रज्ञानाच्या या युद्धात वाचन संस्कृती तारत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती पुरस्कार विजेते कृतिशील शिक्षक डॉक्टर अमोल बागुल यांनी व्यक्त केले.
उच्च तंत्र शिक्षण विभाग आणि ग्रंथालय संचालनालय ग्रंथालय संचालनालय यांच्या वतीने आयोजित वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमा अंतर्गत अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाच्या वतीने दुर्मिळ ग्रंथ प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी डॉ. बागुल उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक नंदकिशोर आढाव, वाचनालयाचे उपाध्यक्ष दिलीप पांढरे, संचालिका शिल्पा रसाळ, किरण अगरवाल, ग्रंथपाल अमोल इथापे ,नितीन भारताल पल्लवी कुक्कडवाल ,वाचक अनिल झवर,श्री राजहंस, सुडके उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. बागुल यांनी वाचन संस्कृतीची द्विशतकी परंपरा असणारे नगर वाचनालय हे आपणा सर्वांच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे.माहिती तंत्रज्ञानाच्या युगात उगवत्या पिढीने वाचते होणे ही काळाची गरज आहे. वाचनालयात असंख्य दुर्मिळ पुस्तकांचा खजिना आहे. युवा पिढीने तो वाचून रीता केला तर त्यांचे आयुष्य खर्या अर्थाने भरून जाईल. वाचनालयाने आयोजित केलेले हे प्रदर्शन त्या दृष्टीने प्रेरक असल्याचे डॉक्टर बागुल म्हणाले.
उद्योजक नंदकिशोर आढाव यांनी यावेळी बोलताना अहिल्यानगर वाचनालयाच्या कर्मचारी व संचालक मंडळ यांच्या संयुक्त प्रयत्नातून चालवलेला हा वाचन संस्कृतीचा वारसा देशासाठी व समजासाठी लोकाभिमुख आहे.वाचनालयाची ज्ञान संपदा युवा वर्ग व बाल वाचकापर्यंत घेऊन जाण्याची व त्यांनीही ती आत्मसात करण्याची गरज आहे. परदेशात ग्रंथालय, पुस्तके व वाचक यांना अनन्यसाधारण महत्त्व व प्रोत्साहन दिले जाते. शासनाने सुरू केलेली वाचन संकल्पनाची ही चळवळ प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते दुर्मिळ ग्रंथ विश्वकोश यांच्या पुस्तकाचे उद्घाटन वाचनालयाच्या सभागृहात करण्यात आले.मान्यवरांचा सन्मान ग्रंथपाल अमोल इथापे व नितीन भारताल यांनी केला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन संचालिका शिल्पा रसाळ यांनी केले आभार कुमारी पल्लवी कुक्कडवाल यांनी मांडले.
अतिशय दर्जेदार व दुर्मिळ असणारे हे प्रदर्शन वाचनालयाच्या हॉलमध्ये 15 जानेवारी पर्यंत वाचनालयाच्या कार्यालयीन वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. महाविद्यालयीन युवक युवती , शाळेतील शाळेतील विद्यार्थी ,प्राध्यापक ,शिक्षक आनिरसिक वाचक यांना भेट द्यावी असे आवाहन वाचनालयात संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. याप्रसंगी संजय गाडेकर,संकेत फटक,पल्लवी कुक्कडवाल, वर्षा जोशी,निखिल ढाकणे यांचे सहकार्य लाभले.