अर्णब गोस्वामी यांना अटक 

इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांना आत्महत्या करण्यास केलं प्रवृत्त्त 

मुंबई :
‘रिपब्लिक टीव्ही’ चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे. इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या मृत्यू प्रकरणात गोस्वामी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
अन्वय नाईक यांनी रिपब्लिक टीव्ही चॅनेलच्या स्टुडिओच्या इंटेरियर डिझाईनचे काम केले होते. त्यासाठी त्यांना अर्णब यांच्याकडून ५ कोटी ४० लाख रुपये येणे होते. परंतु वारंवार बिल मागूनही गोस्वामी यांच्याकडून पैसे दिले जात नव्हते.
त्यामुळे मानसिक तणावाखाली येऊन अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात आत्महत्या केली होती. त्यानंतर त्यांच्या आईने देखील आत्महत्या केली. अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्यामुळं आलेल्या नैराश्यातून आत्महत्या करत असल्याचं नाईक यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात लिहिलं होतं.
 या प्रकरणी अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता यांनी केलेल्या तक्रारीनंतर अलिबाग पोलिसांनी ३०६ कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी चौकशीसाठी अलिबाग पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. वरळी येथील घरातून त्यांना आज सकाळी ताब्यात घेण्यात आलं आहे.