बैलपोळा सण उत्साहात साजरा; पाच पिढ्याची पारंपारिक पद्धत कायम

भारत हा कृषिप्रधान देश असून,श्रावण महिन्यातील शेवटचा सण म्हणजे बैलपोळा साजरा केला जातो. शेतामध्ये शेतकऱ्याबरोबर राबणारे हे बैल शेतकरी कुटुंबातील एक सदस्यच असतात. बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना स्वच्छ धुऊन तूप हळदीने मळले जाते. शेतामध्ये राबणाऱ्या बैलांच्या ऋणाईतून उतराई व्हावे म्हणून शेतकरी बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना सजवतात त्यांची पुजा करून पुरणपोळीचे नैवेद्य अर्पण करतात. यादिवशी बैलाला गुलाल, झुल, घुंगूळमाळे, घुगुळचाळ, गळ्यातील कंडा, रंगीत मण्यांची माळ, पितळी शेंब्या, पितळी तोडे, कवड्याची माळ, गुडग्याचे गंडे, म्होरकी, वेसन, चाळ, कंबरपट्टा, गोंड्याचा कासरा, मंडवळ्या, हार, रंगीबेरंगी फुगे, लाऊन बैलांना सजवल जातं. तर या सणानिमित्त अहमदनगर शहरातील काटवान खंडोबा येथील जाधव मळा परिसरात राहणारे राजू जाधव आणि त्यांचे कुटुंबीय गेल्या पाच पिढ्यापासून पारंपारिक पद्धतीने बैलपोळा सण उत्साहात साजरा करतायेत. बैलपोळा सना निमित्त आज जाधव मळा येथून माळीवाडा येथील मारुती मंदिर पर्यंत बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली .