भटक्या जमातींमध्ये नव्या जाती समाविष्ट
राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार सरकारचा निर्णय
मुंबई : राज्यातील इतर मागासवर्ग विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील जातींच्या यादीमध्ये राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारसीनुसार सरकारने काही नवीन जातींचा अंतर्भाव करून तसेच काही वगळून अद्ययावत यादी तयार केली आहे. नव्या बदलानुसार या पुढे ठेलारी ही जात भटक्या जमाती व यादीतील अ.क्र. 27 येथून वगळून भटक्या जमाती यादीतील अ.क्र. 29 मध्ये धनगर जातीची तत्सम जात म्हणून समावेश करण्यात आला आहे. केवट, तागबाले या जातीचा भटक्या जमाती बमध्ये समावेश करण्यात आला आहे. आयोगाच्या शिफारसीनुसार इतर मागासवर्ग यादीतील अ.क्र. 182 मधील माळी बागवान, राईन, कुंजडा या जातींचा समावेश करण्यात आला आहे. याबाबतचा शासनादेश आज प्रसिद्ध करण्यात आला. दरम्यान ठेलारी जातीचा धनगर जातीमध्ये समावेश करण्यात आल्याने धनगर समाज संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.