माझी वसुंधरा अभियानामध्ये महानगरपालिकेचा राज्यात दुसरा क्रमांक !
सहा कोटींच्या निधीतून नऊ उद्याने उभारणार
अहमदनगर : माझी वसुंधरा अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत नगर महानगरपालिकेला राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा ६ कोटींचा पुरस्कार मिळाला आहे. या रक्कमेतून राज्य शासनाच्या निर्देशानुसार अहमदनगर शहरात सात उद्याने व सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम प्रस्तावित करून राज्य शासनाकडे प्रकल्प अहवाल सादर करण्यात आला होता. त्याला राज्य शासनाकडून मान्यता मिळाली असून शहराच्या विविध भागात सहा कोटी रुपये खर्चुन नऊ उद्याने उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. महापालिकेला गतवर्षी माझी वसुंधरा अभियानांतर्गत बक्षीस मिळाले होते. बक्षिसाच्या सहा कोटी रुपयांच्या निधीतून नव्याने उद्याने विकसित करण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला होता. यामध्ये सावेडी, केडगाव, मुकुंदनगर, सारसनगर, बोल्हेगाव, बुरुडगाव रोड आदी भागात महापालिकेच्या ओपन स्पेसवर नव्याने उद्याने निर्माण करणार आहेत. त्यासाठी राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे. राज्य शासनाने या प्रकल्प अहवालाला मान्यता दिली आहे. यामुळे शहरात नव्याने उद्यानांची निर्मिती होऊन ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना विरंगुळ्यासाठी, खेळण्यासाठी चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे.
नऊ उद्यानांसाठी मंजूर निधी पुढीलप्रमाणे :
* नंदनवन नगर (सावेडी) ७१ लाख २ हजार
* लक्ष्मीनगर ओपन स्पेस (सावेडी) १ कोटी ९० लाख १७ हजार
* राजे संभाजीनगर (बोल्हेगाव) ५२ लाख ८९ हजार
* सोलर पॉवर प्लॅट (सावित्रीबाई फुले संकुल) २८ लाख ५१ हजार
* साई कॉलनी (लिंक रोड केडगाव) ४७ लाख ४४ हजार
* सिव्हिल कॉलनी (मुकुंदनगर) ५२ लाख ६२ हजार
* ऐश्वर्यानगरी (श्रीराम चौक) ४७ लाख ४७ हजार
* भवानी नगर- ६५ लाख १४ हजार
* आयईस – १७ लाख ७२ हजार