भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेत राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी
राजमाता जिजाऊंच्या वेशभूषेतील मुलींनी जीवंत केला स्वराज्य स्थापनेचा इतिहास
सक्षम समाजनिर्मितीसाठी घरोघरी जिजाऊंचे संस्कार रुजविण्याची गरज -अनिता काळे
नगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राजमाता जिजाऊंच्या वेशभूषेत अवतरलेल्या चिमुकल्या मुलींनी स्वराज्याचे स्वप्न साकारले जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम, आलेल्या अडचणी व संस्कारी बाल शिवबा घडविताना अनेक प्रसंग आपल्या भाषणातून जिवंत केले.
कार्यक्रमाचे प्रारंभ जिजाऊ वंदनेने करुन उपस्थितांनी त्यांना अभिवादन केले. यावेळी भिस्तबाग शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता काळे, सहशिक्षिका शितल आवारे, सुरेखा वाघ, अहिल्या सांगळे, योगिता वाघमारे आदींसह विद्यार्थी, पालक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनिता काळे म्हणाल्या की, स्वराज्यासाठी राजमाता जिजाऊंनी शिवबा घडविले. सक्षम समाजनिर्मितीसाठी घरोघरी जिजाऊंचे संस्कार रुजविण्याची गरज निर्माण झाली आहे. मातेने मुलांवर केलेल्या संस्काराने भावी पिढी घडत असते. राजमाता जिजाऊ यांचा आदर्श समोर ठेऊन मुलांवर संस्कार करण्याची गरज आहे. जिजाऊ ते राणी लक्ष्मीबाई तर स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा इतिहास या मातीशी जोडला गेलेला असून, युवतींना हा वारसा पुढे चालवून त्यांच्या प्रेरणेने आपले कार्यकर्तृत्व गाजविण्याचे त्यांनी आवाहन केले.
राजमाता जिजाऊंच्या वेशभूषेत अवतरलेल्या मुलींनी सर्वांचे लक्ष वेधले. विद्यार्थ्यांनी जय जय जिजाऊ… दिव्य पराक्रमाने झाला महाराष्ट्र चिराऊ…., सह्याद्री सांगतो गाथा शौर्याची…. आदी गाण्यांनी उपस्थितांची मने जिंकली. आंम्ही शिवरायांच्या कन्या… या गीतावर मुलींनी नृत्याचे सादरीकरण केले. जिजाऊ पोवाडे व जिजाऊ यांच्या जीवनावरील भाषणांनी उपस्थितांच्या अंगावर शहारे आणले. आपल्या संस्कृती व शौर्याचा इतिहास सांगणाऱ्या या कार्यक्रमाने पालक व परिसरातील नागरिक भारावले.