कास्ट्राईब महासंघाचे महापुरुषांना अभिवादन करुन नूतन वर्षाचे प्रारंभ

भिमा कोरेगाव येथील शौर्य दिनानिमित्त शहीदांना अभिवादन

महापुरुषांच्या विचारधारेवर कास्ट्राईबचे कार्य सुरु – एन.एम. पवळे

नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने नूतन वर्षाचे प्रारंभ महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करुन करण्यात आले. तर भिमा कोरेगाव येथील शौर्य दिनानिमित्त शहीद झालेल्या सर्व शूरवीरांना अभिवादन करण्यात आले.
जिल्हा परिषद येथील कास्ट्राईबच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी शिक्षणाधिकारी (योजना) बाळासाहेब बुगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी कास्ट्राईबचे राज्याध्यक्ष एन.एम. पवळे,  राज्य उपाध्यक्ष वसंत थोरात, जिल्हाध्यक्ष के.के. जाधव, अतिरिक्त महासचिव सुहास धीवर, महिला जिल्हाध्यक्षा नंदाताई भिंगारदिवे, नाशिक विभाग अध्यक्ष ना.म. साठे, मुक्त शिक्षक संघटनेचे युनूस शेख, भूमी अभिलेख कास्ट्राईबचे जिल्हाध्यक्ष आरिफ शेख, मुश्‍ताक कुरेशी, नरोटे मॅडम, मधू खताळ आदींसह कास्ट्राईबचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात के.के. जाधव यांनी दरवर्षी नवीन वर्षाचे प्रारंभ कास्ट्राईबच्या वतीने सामाजिक उपक्रमांनी साजरे होत असते. सर्वसामान्य कामगारांसह शासकीय कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कास्ट्राईब संघटना सतत प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले.
एन.एम. पवळे म्हणाले की, समाजाच्या उध्दारासाठी आपले संपूर्ण जीवन वाहून घेतलेल्या महापुरुषांच्या प्रेरणेने वाटचाल करण्याची गरज आहे. तथाकथित उच्चवर्णीय समाजाकडून होणाऱ्या अन्याय, अत्याचारापासून व गुलामगिरीतून बहुजन समाजाला बाहेर काढण्यासाठी प्रत्येक महापुरुषांनी संघर्ष करुन वंचितांना आधार देण्याचे काम केले. या महापुरुषांच्या विचारधारेवर कास्ट्राईबचे कार्य सुरु असून, कर्मचारी वर्गाला न्याय व त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी संघटनेचा संघर्ष सुरु आहे. तर अन्यायाविरोधातील भिमा कोरेगावचा लढा सर्वांना स्फुर्ती देणारा असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांनी कास्ट्राईबच्या माध्यमातून सामाजिक कार्यासह कर्मचाऱ्यांच्या न्याय, हक्कासाठी सुरु असलेल्या चळवळीतून अनेकांना न्याय मिळाला असल्याचे स्पष्ट करुन त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. वसंत थोरात यांनी संघर्षातून संघटनेला अनेक प्रश्‍न सोडविण्यास यश आले असून, शासनस्तरावरील संघटनेचे इतर प्रश्‍न सोडविण्यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.