बिबट्यापासून असा करा बचाव
संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा या ठिकाणी एका दीड वर्षाच्या मुलीचा बिबट्याने बळी घेतला. या पार्श्वभूमीवर अनेकांकडून बिबट्या, समोर आल्यानंतर कुठल्या गोष्टींनी आपण स्वतःचा बचाव करू शकतो? याबाबत काही माहिती देण्यात आलेली आहे.
आलेल्या माहितीनुसार बिबट्या हा कुठल्याही वातावरणात स्वतःला सहज जळवून घेतो. शहर किंवा गावाजवळ अस्वच्छता असल्यास तेथे वावरणारी डुकरे किंवा कुत्री यांच्या रूपाने त्याला खाद्य उपलब्ध होत असल्याने, बिबट्याचा वावर मानवी वस्त्यांजवळ सध्या वाढलेला आहे. भक्षाचा पाठलाग करत तो मानवी वस्तीत किंवा घरात शिरल्याची अनेक उदाहरणे आपण सोशल मीडियावर पाहिलेली आहेत. बिबट्या अत्यंत वेगवान प्राणी आहे. त्यामुळे मानवी वस्तीत घुसला तर तो प्रचंड धुमाकूळ घालू शकतो. अशावेळी अचानक बिबट्या आपल्यासमोर आला तर शांत रहा, घाबरू नका किंवा पळून जाण्याचा प्रयत्न करू नका. आपण पळू लागल्यास बिबट्याचे लक्ष आपल्याकडे वेधले जाऊ शकते आणि तो आपल्यावर हल्ला करू शकतो. बिबट्यासमोर असताना स्वतःला मोठे दिसण्याचा प्रयत्न करा. हात वर उचला किंवा काही वस्तू हातात घेऊन स्वतःला बिबट्यापेक्षा मोठे असल्याचे भासवा. याशिवाय जोरात ओरडून किंवा शिट्टी वाजवून आवाज करा, मोठ्याने गाणे किंवा संगीतही लावू शकता. अशा आवाजाची बिबट्याला सवय नसते. त्यामुळे अशा आवाजांनी घाबरून तो पळून जाण्याची शक्यता जास्त आहे. बिबट्याने हल्ला केल्यास वस्तू, दगड, काठी किंवा इतर कोणत्याही उपलब्ध वस्तूने त्याला मारण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून त्याला शरीरावर कुठेतरी इजा होईल आणि तो त्याच्या हाती आलेला भक्ष सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करेल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिबट्या हा शिकार करताना सर्वप्रथम हाती आलेल्या शिकारीची मान पकडतो आणि आपल्या दातांनी त्या ठिकाणी इजा करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे अर्थातच हाती आलेली शिकार, ही जीव सोडते. अशावेळी आपली मान सांभाळण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी मानेभोवती जाड कपडा आपण गुंडाळू शकता आणि आपली मान वाचली तर आपला जीव नक्कीच वाचू शकतो. अहमदनगर जिल्ह्यामध्ये संगमनेर, अकोले तालुक्यातील बिबट्यांचा वावर जास्तीत जास्त आहे. संगमनेर तालुक्यातील घटना अजून जागी असल्याने या प्रकारची खबरदारी घेण्याची माहिती अनेकांकडून दिली जात आहे. वन खात्याने या परिसरातून अनेक पिंजरे लावून बिबटे जरी जेरबंद केले, तथापि कुठला बिबट्या हा कुठल्या वेळी येईल हे सांगणे मुश्कील आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःचा बचाव अशा पद्धतीने करणे गरजेचे आहे.