‘बिग बॉस सिझन ३ २०२१ मध्ये….

पुढच्या वर्षी 'बिग बॉस ३ प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई :

बहुचर्चित “बिग बॉस मराठी च्या ( Bigg Boss Marathi) तिसऱ्या पर्वाला पुढील वर्षीचा मुहूर्त मिळणार आहे. कलर्स मराठी वाहिनी आणि निर्माते ‘बिग बॉस मराठी’ पुन्हा सुरु करण्यास उत्सुक आहेत, मात्र महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेत 2021 मध्येच या रिऍलिटी  शोची सुरुवात होईल. बिग बॉसच्या आगमनाची चाहूल लागल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चित्रपट-मालिका यांची शूटिंग मार्चपासून चार महिने बंद होती. जुलै महिन्यात चित्रीकरणाला परवानगी मिळाल्यानंतर गाडी हळूहळू रुळावर आली. चित्रीकरण करताना कोरोनाविषयक नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. एकीकडे सलमान खानचा हिंदी बिग बॉस (Bigg Boss 14) सर्व नियम पाळून सुरु आहे. त्यामुळे प्रेक्षक मराठी पर्वाचीही वाट पाहत आहे. मात्र ही उत्सुकता पुढील वर्षीच शमणार आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या एंटरटेनमेंट टाइम्सने बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाविषयी वृत्त दिले आहे.

बिग बॉसच्या घरात जवळपास 15 स्पर्धक रात्रंदिवस एकत्र राहतात. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धक आणि निर्मात्यांना अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग अशा नियमांचे पालन कसे होणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. बिग बॉसच्या घरातील टास्कमध्येही कोरोनाशी निगडीत क्रिएटिव्ह खेळ पाहायला मिळू शकतात.

मांजरेकरांकडेच पुन्हा सूत्रसंचालन?

दिग्गज अभिनेते-निर्माते महेश मांजरेकर ‘बिग बॉस मराठी’चे सूत्रसंचालन करतात. मांजरेकरांच्या स्टाईलचे अनेक चाहते आहेत. त्यामुळे पुढील सीझनची सूत्रंही मांजरेकरांच्याच हाती सोपवली जाण्याची शक्यता आहे. सध्या कलर्स वाहिनीवर बिग बॉस मराठीचा पहिला सीझन पुन्हा दाखवला जातो. मात्र सव्वा वर्षापासून ‘बिग बॉस’चा मराठमोळा आवाज नव्याने ऐकण्यासाठी प्रेक्षकांने कान आसुसले आहेत.

‘         “बिग बॉस मराठी” च्या पहिल्या पर्वात अभिनेत्री मेघा धाडे विजेती ठरली होती. तर दुसऱ्या पर्वाच्या विजेतेपदाच्या ट्रॉफीवर शिव ठाकरेने आपले नाव कोरले होते. आता या सीझनमध्ये कोण सहभागी होणार याची उत्सुकता वाढली आहे.