सरत्या वर्षाला निरोप,Bye Bye 2020

नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात पर्यटकांची गर्दी 

पणजी : 

सरत्या  २०२० ला निरोप देऊन  २०२१ च्या स्वागतासाठी संपूर्ण जग सज्ज झाले आहे. अशातच पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेल्या गोव्यातही पर्यटकांनी तोबा गर्दी गेली असून, नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात तब्बल ४० ते ४५ लाख पर्यटक दाखल झाले असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. नववर्ष साजरे करण्यासाठी गोव्यात ४० ते ४५ लाख पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत. ३१ डिसेंबर रोजी आतापर्यंत गोव्यात दाखल झालेल्या पर्यटकांचा आढावा घेण्यात आला. कोरोनासंदर्भातील सर्व खबरदाऱ्या घेतल्या जात असून, पर्यटकांमध्ये याबाबतचे महत्त्व पटवून दिले जात आहे, असेही प्रमोद सावंत यांनी नमूद केले. तत्पूर्वी गोव्यात नाइट कर्फ्यू लावण्याचा निर्णय शासनाने अधिकृतरित्या घेतलेला नाही, असेही प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. गोव्याच्या आरोग्य विभागाने राज्यात नाइट कर्फ्यू लावण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी म्हटले होते.

राणे यांच्या विधानावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान, गोव्यातील बागा, कलंगूट, मीरामार, कोलवा यांसह सर्व प्रमुख बीच गर्दीने फुलून गेले आहेत. कोरोना संकटातून देश सावरत असताना हळूहळू आता रेस्टॉरंट, हॉटेल ही  सुरू झाली आहेत. पर्यटकांना उत्तम सेवा देण्यासाठी गोव्यातील हॉटेल व्यवसायिकही सज्ज झालेले आहेत. गोव्यातील प्रमुख बीचवर असलेल्या हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये न्यू ईयर सेलिब्रेशन पार्टीजची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. गोव्याची खासियत असलेल्या वेगवेगळ्या स्पेशल सी फूडचे मेनू खास खवय्यांसाठी तयार  आहेत. गोव्याप्रमाणे कोकणातही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. कोकणातील गणपतीपुळे, वेळणेश्वर, तारकर्ली, देवबाग अशा प्रमुख  ठिकाणांना पर्यटकांची जास्त पसंती दिली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून सध्या कोकणात  जवळपास तीन लाख पर्यटक दाखल झाले  आहेत.