बलात्कार प्रकरणात चित्रा वाघ यांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान 

छत्रपतींचा महाराष्ट्र केवळ भाषणात नको, कृतीत दाखवा,

रायगड :

पेणमधील चिमुरडीवर झालेली बलात्कार आणि हत्येची घटना अतिशय हृदयद्रावक आहे. राज्यात आज 60 वर्षीय आजीपासून अडीच वर्षीय चिमुरडीपर्यंत कुठली ही महिला सुरक्षित नाही. मुख्यमंत्री महोदय,  आपला महाराष्ट्र श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हे फक्त तुमच्या भाषणात नाही तर कृतीतही दिसू द्या, असं आवाहन भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ  यांनी उद्धव ठाकरे  यांना केलं आहे. “महाराष्ट्रामध्ये महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचं हे  सत्र  दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. पेणमध्ये अडीच वर्षीय चिमुकलीवर, जिने अद्याप आयुष्यही पाहिलं नाही, हसण्या-बागडण्याचे दिवस असताना तिच्यावर निर्घृण बलात्कार करुन हत्या करण्यात आली. आरोपी अशाच प्रकारच्या गुन्ह्यांसाठी जेलमध्ये शिक्षा भोगत होता. कोरोना काळात मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना आम्ही विनंती केली होती, की त्यांना न्यायालयाला विनंती करावी, की महिलासंबंधी गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या आरोपींना कोरोना काळात जामीन किंवा पॅरोलवर सोडण्यात येऊ नये” असं चित्रा वाघ म्हणाल्या.

“आमच्या मागणीची विचार न झाल्यामुळे संबंधित आरोपीने जेलबाहेर आल्यानंतर पुन्हा असं दुष्कृत्य केलं. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे, असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. लातूरमध्ये साठ वर्षीय महिलाही बलात्कारासारख्या किळसवाण्या  प्रकारातून सुटलेली नाही. म्हणजे साठ वर्षांची वयोवृद्ध आजी असू देत किंवा अडीच तीन वर्षांची चिमुरडी, बलात्काराला बळी गेल्या. आज राज्यात महिला सुरक्षा किंवा सक्षमीकरण हे फक्त घोषणेपुरतं उरलं आहे. मुख्यमंत्री महोदय आपला महाराष्ट्र श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे हे फक्त तुमच्या भाषणात नाही तर कृतीत ही दिसू द्या” असं आवाहन चित्रा वाघ यांनी केलं. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात अडीच वर्षाच्या चिमुरडीची बलात्कार करून हत्या झाल्याचं बुधवारी समोर आलं होतं. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे जामिनावर सुटलेल्या नराधमानेच पुन्हा हे दुष्कृत्य केलं. या प्रकरणी आरोपीला अटक करुन चौकशी करण्यात येत आहे.