राज्यात चार्वाकशाही राबविणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात राजकीय डिच्चूफत्ते करुन सत्तापरिवर्तन करण्याचा संकल्प
लाडका भाऊ-लाडकी बहिण योजना सत्ता टिकवून ठेवण्यासाठी दिवसा-ढवळ्या फसवणुक असल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- चार्वक अर्थशास्त्रावर आधारित चार्वाकशाही राबविणाऱ्या तीन चार्वाक राज्यकर्त्यांचा विधानसभा निवडणुकीत राजकीय डिच्चूफत्ते करुन सत्तापरिवर्तन करण्याचा संकल्प पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने करण्यात आला आहे. तर राज्यातील मतदारांपर्यंत जय शिवाजी जय डिच्चू कावा! हा महामंत्र घरोघरी घेऊन जाण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत मध्यप्रदेशात भाजपने लाडक्या बहिणींना मासिक पोटगी देऊन मोठे यश मिळविले, त्यातून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात चार्वाकशाही फोफावत आहे. पूर्वी मतदारांना पैसे, दारू देऊन मतं विकत घेण्याचा मार्ग, लाडकी बहिण योजना राबवून कायदेशीर करण्यात आला आहे. आज महाराष्ट्रात तीन चार्वाक सत्ताधाऱ्यांनी चार्वाक अर्थशास्त्र प्रणालीचा जोरात विस्तार सुरू ठेवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्तीला लोकशाहीमध्ये काहीएक वाव न देता, चार्वाकशाहीच्या मदतीने ताबेमारी, सत्तामारी आणि टक्केवारीतून सत्तासंपती ताब्यात ठेवण्याचा जवळचा मार्ग राज्यकर्त्यांना प्राप्त झाला असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात झोपडपट्टया वाढत असताना लॅण्ड व्हॅल्यू कॅप्चर योजनेच्या माध्यमातून परवडणारी घरे देण्याचा साधा विचार देखील राज्यकर्ते करत नाहीत, त्यातून झोपडपट्टीमध्ये नालीच्या कडेला उघड्यावर नाईलाजाने अंघोळ करणाऱ्या बहिणींबाबत सध्याच्या राज्यकर्त्यांना चिंता नाही. जलसंधारणाचा प्रश्न सोडवून शेतकऱ्यांना बरे दिवस आणता येतील, याबाबत चार्वाक राज्यकर्ते उदासीन आहेत. लोककेंद्रीत प्रशासनाकडे वळण्याची त्यांना गरज वाटत नाही व शाश्वत विकासाबाबत त्यांना थोडीदेखील आस्था नाही. बेरोजगारी टोकाला पोहोचली आहे. त्यावर लाडका भाऊ-लाडकी बहिण असा जुजबी उपाय राबवून सत्ता टिकवून ठेवण्यासाठी दिवसा-ढवळ्या जनतेची फसवणुक सुरु असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
लोककल्याणकारी, समाजवाद आणि लोकशाही याला तिलांजली वाहून चार्वाकशाही मोठ्या जोमाने वाढविण्यात येत आहे. ज्ञान आणि कर्माला बगल देऊन आज आणि आत्ताच्या चंगळवादाला खतपाणी घालण्यात येत आहे, यातून विकसित आणि समृद्ध भारत उभा राहण्याऐवजी आयातखाऊंच्या चार्वाकफौजा तयार होणार आहे. महाराष्ट्रावर साडेसात लाख कोटींचे कर्ज असताना तीन सत्ताधारी चार्वाक, घोषणांचा पाऊस पाडत आहेत. महाराष्ट्रातील शेकडो सहकारी साखर कारखाने चार्वाकवाद्यांनी मोडीत काढले, त्याचबरोबर हजारो सहकारी पतसंस्था चार्वाकशाहीला बळी पडल्या.एकंदरीत महाराष्ट्रात आणि देशभरात चार्वाकशाही व्यापक होत आहे. ज्यांनी चार्वाकशाहीचा वापर करून कोट्यावधी रूपये खाल्ले त्यांना ईडीची भोकाडी दाखवून सत्तेत सहभागी केले. लोकांना लाचार करून सत्ता काबीज करण्यासाठी हा चाललेला केविलवाणा प्रयत्न तमाम जनतेच्या लक्षात आला आहे. त्यामुळे जय शिवाजी म्हणजे लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती अशाच उमेदवाराला मतं आणि ज्यांच्याकडे लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती नाही त्यांच्याविरुद्ध जय डिच्च्यूकावा, यातूनच चार्वाकशाहीच्या विरूद्ध डिच्च्यूफत्ते करता येणार असल्याचे ॲड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे.
मतदारांपर्यंत जय शिवाजी जय डिच्चू कावा! हा महामंत्र पीपल्स् हेल्पलाईन व भारतीय जनसंसद नेण्यासाठी प्रयत्न करत आहे. भ्रष्टाचार आणि टक्केवारी ही किती टोकाला पोहोचली ही बाब मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा बसवलेला पुतळा कोसळला यातून चार्वाकशाहीची प्रचिती जनतेला आलेली आहे. चार्वाक राज्यकर्त्यांच्या विरोधात संघटनेचे ॲड.कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, वीर बहाद्दूर प्रजापती, जालिंदर बोरुडे, ओम कदम, शाहीर कान्हू सुंबे, अशोक भोसले आदींनी पुढाकार घेतला आहे.