चर्मकार समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्यामध्ये लग्नात डिजे बंदीचा ठराव
चर्मकार संघर्ष समितीच्या वधू-वर परिचय मेळाव्यात एकवटला समाजबांधव
भविष्याची दिशा ठरवून समाजाची वाटचाल -आ. संग्राम जगताप
नगर (प्रतिनिधी)- चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने शहरात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय चर्मकार समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्यानिमित्त जिल्ह्यासह राज्यातील चर्मकार बांधव एकत्र आले होते. या वधू-वर मेळाव्यात लग्नात डिजे बंदीचा ठराव घेण्यात आला. तर डिजे लावणाऱ्या समाज बांधवांच्या लग्नात संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार नसल्याचा इशारा देण्यात आला. यावेळी चर्मकार समाजबांधव व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
शहराच्या टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात झालेल्या चर्मकार समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्याचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संत रविदास महाराज यांना अभिवादन करुन दीपप्रज्वलनाने झाले. याप्रसंगी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपतराव बारस्कर, चर्मकार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी साळवे, अजित रोकडे, आर्किटेक्चर कल्याणराव सोनवणे, विश्वनाथ निर्वाण, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लोहकरे, प्रकाश पोटे, बाळासाहेब केदारे, जिल्हा संघटक दिलीप शेंडे, वधू-वर मंडळ अध्यक्ष आश्रू लोकरे, वधू-वर केंद्रप्रमुख बापूसाहेब देवरे, शशीकलाताई झरेकर, उद्योजक बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठलराव जयकर, रामकिसन साळवे, आप्पासाहेब केदारे, मनीषा जाधव आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात शिवाजी साळवे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले, आंबेडकर यांची विचारधारा घेऊन संघटनेच्या माध्यमातून कार्य सुरु आहे. समाज नोकरी, व्यवसाय व उद्योगधंद्यामुळे विखुरला गेल्याने मुला-मुलींचे लग्न जमविताना मोठा प्रश्न उभा राहत आहे. दरवर्षी वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करुन समाजातील मुला-मुलींचे लग्न जमविण्याचे काम केले जात आहे. तर या कार्यक्रमानिमित्त राज्यातील चर्मकार समाज बांधव एकत्र येत आहे. चर्मकार समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरोधात सातत्याने संघटनेच्या माध्यमातून आवाज उठविण्यात आला आहे. तर समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी संघटना प्रयत्नशील आहे. संघटनेने गटई कामगारांना आंदोलनाच्या माध्यमातून पीच परवाने मिळवून दिले असल्याची माहिती त्यांनी दिली.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, दरवर्षी होणाऱ्या वधू-वर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून शहरात चर्मकार समाजबांधव एकत्र येत आहे. या कार्यक्रमातून अनेकांच्या लग्नाच्या रेशीमगाठी जुळल्या आहेत. हा मेळावा फक्त लग्न जमविण्यापुरता मर्यादीत न राहता, सर्व समाज एकत्र आल्याने भविष्याची दिशा ठरवून वाटचाल करत आहे. समाजासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून 50 लाख रुपये निधी उपलब्ध करुन सावेडीत संत रविदास महाराज विकास केंद्राचे काम सुरु आहे. तसेच केडगावमध्ये देखील समाजाला जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यासाठी सुद्धा 50 लाख रुपयांचा निधी दिला आहे समाजात विविध संघटना कार्यरत असून, समाज हित हे एकमेव ध्येय समोर ठेऊन कार्य करत आहे. चर्मकार संघर्ष समितीच्या माध्यमातून समाजाला व नवीन पिढीला दिशा देणारे कार्य सुरु आहे. सदर लोकहित चळवळीचे कार्य सर्वांना पुढे घेऊन जावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या मेळाव्यात विवाह समारंभाप्रसंगी समाजात रुजू पाहत असलेले चुकीचे पायंडे मोडीत काढण्याचे आवाहन करण्यात आले. महिलांनी अंधश्रद्धा झुगारून पुढे यावे. डीजे मुक्तीच्या ठरावाबरोबरच डोळ्यांना घातक ठरत असलेल्या लेजर लाईटला देखील प्रतिबंध करण्याचे स्पष्ट करण्यात आले. उपस्थित सर्व समाज बांधव व महिलांनी या ठरावाला हात उंचावून एकमुखाने सहमती दर्शवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन नन्नवरे व सुनील धस यांनी केले. आभार बाळकृष्ण जगताप यांनी मानले.