दहिवाळ सराफ खरवंडीकर यांच्याकडून अखंड हरिनाम सोहळ्याचे आयोजन श्री संत खंडोजीबाबा यांच्या एकविसाव्या स्मृतिदिनाचा उपक्रम
पंचक्रोशीतील ग्रामस्थांना सहभागी होण्याचे आवाहन
नगर (प्रतिनिधी)- श्री संत खंडोजीबाबा यांच्या एकविसाव्या स्मृतिदिनानिमित्त खरवंडी कासार (ता. पाथर्डी) येथे तीन दिवसीय अखंड हरिनाम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी 9 जानेवारी रोजी या सोहळ्याचे प्रमुख संत महंत वारकरी परिसरातील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रारंभ होणार आहे. या धार्मिक सोहळ्यात पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजक तथा निमंत्रक नवनाथभाऊ दहिवाळ, देवराव ढाकणे, गंगाधर ढाकणे व भगवानगड परिसरातील वारकरी संप्रदायाच्या वतीने करण्यात आले आहे.
गुरुवारी सकाळी कलश व विना पूजन केले जाणार आहे. तर दुपारी ह.भ.प. संतोषानंद भारती महाराज (मुंगूसवाडे) यांचे प्रवचन तर रात्री ह.भ.प. जनार्दन महाराज माळवदे (अहिल्यानगर) यांचे किर्तन होणार आहे. शुक्रवारी (दि.10 जानेवारी) ह.भ.प. नाथ माऊली जोजारे (आपेगाव) यांचे किर्तन आणि रात्री ह.भ.प. धनंजय महाराज उदावंत (पारनेर) यांचे किर्तन होणार आहे.
शनिवारी (दि.11 जानेवारी) सकाळी 11 ते दुपारी 1 च्या दरम्यान ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली धायगुडे (भगवानगड) यांचे काल्याचे किर्तनाने या सोहळ्याचा समारोप होणार आहे. तसेच भाविकांसाठी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर तीन दिवस या सोहळ्यानिमित्त पहाटे काकड आरती, सकाळी गाथा भजन, रामायण, संध्याकाळी हरिपाठ, रात्री कीर्तन व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा होणार आहे. ज्ञानेश्वरी पारायण ह.भ.प. बाबासाहेब महाराज खेडकर व ह.भ.प. आसाराम महाराज पाथरकर हरिपाठ करणार आहे.
खंडोजी बाबा लोणी यांचे वारणी तालुक्यातील शिरूर कासार (जि. बीड) हा छोट्याशा गावामध्ये एका सर्वसाधारण कुटुंबामध्ये जन्म झाला. जन्मापासूनच त्यांच्यात देवदर्शन आणि अध्यात्माची ओढ होती. बाबा पांडुरंगाचे भक्त होते. खंडोजी बाबा हे रिद्धी, सिद्धी आणि वाचा सिद्धी प्राप्त असलेले वारकरी होते. त्यांची पुण्यतिथी 11 जानेवारी रोजी असते. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त बाबांचे सेवेकरी आणि निसिम भक्त नवनाथभाऊ दहिवाळ सराफ खरवंडीकर हे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तीन दिवसीय सप्ताहाचे आयोजन केले आहे. मागील वीस वर्षापासून दहिवाळ परिवार, ढाकणे परिवार व समस्त खरवंडी काटेवाडी, मालेवाडी परिसरातील ग्रामस्थ हा सप्ताह करत आहेत.