पाथर्डीच्या तहसिलदारांनी काढलेले परिपत्रक शेवटच्या शेतकऱ्याला न्याय देणारे -शरद पवळे

शिव पानंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने तहसिलदार नाईक यांचा सन्मान

नगर (प्रतिनिधी)- पिढ्यान पिढ्या शेतकऱ्यांचा शेतरस्त्यासाठी चाललेला संघर्ष थांबावा, यासाठी महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने राज्यभर सुरू केलेल्या आंदोलनाला राज्यभर मोठा शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळत मिळत आहे. तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या मागण्या गांभीर्याने घेत शासन निर्णयाच्या अंमलबजावणी करत विशेष परिपत्रक काढत गावोगावी ग्राम शेतरस्ता समित्या स्थापन करण्याचे निर्देश ग्रामपंचायतींना देत शासन निर्णयाच्या अंमलबजावणी करण्यासंदर्भात सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत. शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेवून घेतलेल्या निर्णयाबद्दल शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदार उद्धव नाईक यांचा सन्मान करण्यात आला.
या सन्मान सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्र राज्य शिव पानंद रस्ता चळवळीचे प्रणेते शरदभाऊ पवळे, समन्वयक दादासाहेब जंगले पाटील, पोपट शेळके, विकास जाधव, अशोक कचरे, संजय स्वामी, पोपट जाधव, विजय कचरे, नानासाहेब बनसोडे, विठ्ठल निर्मल, भाऊसाहेब पाठक आदी उपस्थित होते. उपस्थित शिष्टमंडळाने तहसीलदारांकडून सन्मानपूर्वक परिपत्रक स्विकारले.
पाथर्डीच्या तहसिलदारांनी काढलेले परिपत्रक शेवटच्या शेतकऱ्याला न्याय देणारे असल्याची भावना महाराष्ट्र राज्य शिव पानंद रस्ता चळवळीचे प्रणेते शरदभाऊ पवळे यांनी व्यक्त केली. शिवपानंद शेतरस्ता चळवळीत गावोगावचे शेतकरी गांभीर्याने सहभागी होत असून, या आंदोलनाला न्यायालयीन महत्त्व प्राप्त झाल्यानंतर प्रशासकीय कार्यालयाकडून शेतकऱ्यांची शेतरस्त्यांसाठी होणारी हेळसांड थांबवण्यासाठी विविध सामाजिक संघटना अन्नदाता असलेल्या शेतकरी वर्गाच्या पाठीशी उभे राहत आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नियोजित बैठकीत राजव्यापी आंदोलनाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी पाथर्डी शिव पानंद शेतरस्ता कृती समितीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर पाथर्डी तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी प्रशासनाला शेतरस्त्या संबंधित विविध मागण्यांचे निवेदन दिले होते. त्याच्या पाठपुराव्यानंतर शासन निर्णयाच्या अंमलबजावणी करत विशेष परिपत्रक पाथर्डी तहसिलदारांनी काढले आहे.