दसरा सण संस्कृती रक्षण दिन म्हणून साजरा करावा समस्त हिंदू संप्रदाय व समित्यांचे जाहिर आवाहन!
नगर शहरात प्रथमच दसरा सणासाठी थाटणार पारंपरिक पोषाखाचे स्टाल हिंदू धर्मियांना खरेदीसाठी आवाहन
अहमदनगर : दसरा सण संस्कृती रक्षण दिन म्हणून साजरा करावा, असे जाहिर आवाहन शहरामधील समस्त हिंदू संप्रदाय व समित्यांचे वतीने करण्यात आले आहे. नगर शहरात प्रथमच दसरा सणासाठी पारंपरिक पोषाखाचे स्टॉल थाटण्यात येणार आहेत. दि. ७ ते ९ ऑक्टोंबर २०२४ ला दिल्लीगेट आणि प्रोफेसर कॉलनी चौकामध्ये थाटण्यात येणारे स्टॉलवरून शहरातील हिंदू संस्कृती प्रेमींनी आपल्या परिवारासाठी आवश्यक खरेदी करावी, असे आवाहन प्राचीन संस्कृती संवर्धन मंडळाचे बापू ठाणगे यांनी केले आहे. आपल्या पूर्वापार चालत आलेल्या हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे विजयादशमीचा अर्थात दसरा सण साजरा करावा. आपल्या संस्कृतीचा आदर्श वरसा आपल्या कृतीमधून पुढील पिढीसमोर ठेवावा. आपले सण- उत्सव खरे तर धर्माधिष्ठित आचरणाचा संदेश देत असतात, हे लक्षात घेऊन अत्यंत श्रध्देने आणि आदराने सण-उत्सव साजरे करणे आपल्याच हातात आहे. शारदीय नवरात्रौत्सव हा हिंदू धर्मीयांना देवीच्या उपवासाचे महत्व सांगणारा आणि देवीच्या उपासनेचा संदेश देणारा सोहळा आहे. शास्त्र आणि शस्त्र यांचे पूजन म्हणजे दसरा दिवशी शहरातील सर्व हिंदूधर्मियांनी पारंपरिक पोषाख परिधान करून आपल्या संस्कृतीचा अभिमान मिरवावा. आपल्या पिढीजात शास्त्र आणि शस्त्रांचे थाटात आणि श्रध्देने पूजन करावे.
तसेच दुर्गामाता दौडमध्ये दररोज सकाळी ७ वाजता सहभागी व्हावे. आई जगदंबेची उपासना-आराधना म्हणजे दुर्गामाता दौड आहे. हिंदू धर्मामधील पराक्रम तेवत ठेवण्यासाठी आणि आई भवानी देवीकडून संकटाचा सामना करण्याची शक्ती मिळवण्यासाठी दुर्गामाता दौडचे आयोजन केले जाते. सकाळी ७ वाजता आपल्या परिसरातील चौकांमधून निघणारी दुर्गामाता दौड तासाभरात जवळच्या मंदिरांमध्ये दर्शनास पोहोचते. देवी-देवतांचा जयघोष करत देशभक्तीपर गीतांचे गायन करत ही दौड चालते. पारंपरिक पोषाख परिधान करून या दुर्गामाता दौडमध्ये शहरवासियांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. सावेडी उपनगरातही दुर्गामाता दौडचे आयोजन केले जाणार आहे. कुर्ता, पायजमा, धोतर, टोपी, फेटा, दंड या साहित्याचे तीन दिवस दिल्लीगेट आणि प्रोफेसर कॉलनी चौकात लागणारे स्टाल ही दसरा सणाच्या खरेदीसाठी मोठी पर्वणीच आहे. हिंदूधर्माभिमानींनी या खरेदीचा लाभ घेऊन दसरा सण साजरा करावा, असे आवाहन शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थानचे बापू ठाणगे, शिल्पकार प्रमोद कांबळे, वेदमूर्ती निसळ गुरुजी, वारकरी संप्रदायाच्या हरी भक्त परायण श्रीमती प्रभाताई भोंग, श्री स्वामी समर्थ केंद्राचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत लोळगे, पतंजलीचे प्रमुख पवन पारेख, इस्कानचे मदन कांबळे, नाथभक्त काका शेळके आणि मिलिंद चवंडके आदींनी केले आहे .