अहिल्यानगर मध्ये दाखल्यांसाठी ससेहोलपट अखेर थांबली
प्रभाग कार्यालयातून दररोज 150 जन्म मृत्यूच्या दाखल्यांचे होणार वितरण
अहिल्यानगर महानगरपालिका प्रशासनाने प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयात जन्ममृत्यूच्या दाखल्यांचे वितरण सध्या सुरू केले आहे. त्यामुळे दाखल्यांसाठी सुरू असलेली नागरिकांची ससेहोलपट आता थांबली आहे. एका प्रभाग समिती कार्यालयातून दररोज 40 ते 50 दाखल्यांचे वितरण करण्यात येत आहे. याशिवाय या कामासाठी आयुक्त यशवंत डांगे यांनी स्वतः यंत्रणा उभी केली आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय बऱ्याच प्रमाणात दूर झाली. जन्ममृत्यूच्या दाखल्यांसाठी नागरिकांना जुन्या महापालिकेत हेलपाटे मारावे लागत होते. दाखलांसाठी अर्ज केल्यानंतर चार ते सहा दिवसांनी दाखला मिळत होता. पण दाखल्यासाठी अनेकदा रांगेतही उभे राहावे लागत होते. तरीदेखील दाखला वेळेत मिळेलच याची शाश्वती नव्हती. त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. या नागरिकांच्या अनेक तक्रारी होत्या. दाखल्यांमधील चुका दुरुस्त करण्यासाठीसुद्धा नागरिकांना हेलपाटे मारावे लागत होते. नागरिकांच्या या सर्व तक्रारींची दखल घेत, आयुक्त यशवंत डांगे यांनी दाखले देण्याच्या कामाचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही महिन्यांपासून प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयात दाखले देण्याची सुविधा सुरू आहे. त्यामुळे आता नागरिकांना जन्ममृत्यूचे दाखले केवळ जुन्या महापालिका कार्यालयातच नव्हे तर शहरातील चारही प्रभाग समिती कार्यालयात उपलब्ध झाले आहे. या कामासाठी प्रभाग समिती कार्यालयातील प्रभाग अधिकाऱ्यांना सब रजिस्टरचे अधिकार देण्यात आले आहेत. तसेच विवाह नोंदणी प्रमाणपत्रदेखील याच प्रभाग समिती कार्यालयात मिळत असल्याने नागरिकांची गैरसोय आता दूर झाली आहे. आयुक्त डांगे यांच्या या निर्णयामुळे नागरिकांची दाखल्यांसाठीची ससेहोलपट बऱ्याच प्रमाणात थांबली आहे.