आरक्षण न दिल्यास धनगरी हिसका दाखवू
भाजप-शिवसेना युती सरकारने २०१४ मध्ये पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर एसटी आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सरकारने आरक्षण दिले नाही. त्यामुळे आरक्षणाच्या मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने १८ सप्टेंबरपासून नेवासे फाटा येथे सात जण आमरण उपोषण सुरू करणार आहेत. सरकारने शब्द पाळला नाही त्यामुळे समाजात आक्रोश आहे. आगामी विधानसभेत धनगरी हिसका दाखवू असा इशारा, प्रल्हाद सोरमारे यांनी पत्रकार परिषदेत रविवारी दिला. अशोक कोळेकर, राजेंद्र तागड, नीलेश महानोर, बाळासाहेब कोळसे, देविदास बानगुडे, राजेंद्र पांढरे आदी पत्रकार परिषदेवेळी उपस्थित होते. सोरमारे म्हणाले, धनगर एसटी आरक्षणासाठी सकल धनगर समाज नेवासे फाटा येथे एकत्र येणार आहे. उपोषणाची दखल न घेतल्यास गोदावरी नदीत सामुदायिक जलसमाधी घेऊ. नुकत्याच मुंबईत मंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत कायद्याच्या चौकटीत बसेल असे आरक्षण देऊ असे सांगितले. पण दहा वर्षापासून आम्ही तेच ऐकतो आहोत. या बैठकीला आमचा विरोध असतानाही बैठक घेतली. शिष्टमंडळाने त्या बैठकीला जायला नको होते. आता केंद्राने अ, ब, क, ड, अशी वर्गवारी करा, असे सांगितले त्यानुसार आम्हाला एसटीतून आरक्षण द्यावे.