श्री एकदंत गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण

अहमदनगर : श्री एकदंत गणेश मंडळाच्या वतीने एकदंत कॉलनी, दातरंगे मळा येथे गणेश उत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी आणि महिलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासर्व स्पर्धेचे बक्षीस वितरण देखील करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संदिप दातरंगे उपस्थित होते. तसेच परिसरातील नागरीकही उपस्थित होते. यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते संदिप दातरंगे म्हणाले की, आजच्या या युगात विद्यार्थी हे मोबाईलच्या अति वापर करतात, त्यामुळे मैदानी खेळांकडे विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष होत चालले आहे. श्री एकदंत गणेश मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करून एक चांगले व्यासपीठ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहे. मैदानी खेळ खेळण्यात मेहनत, कौशल्य, क्षमता अशा सर्व बाबींचा कस लागतो. कस लागल्यानंतर विद्यार्थ्याला जिंकण्याचे आव्हान असते आणि हरण्याची भीती देखील असते. अशी आव्हाने आणि भितींचा सामना करूनच विद्यार्थी विकसित होत जातो, असे प्रतिपादन शिवसेना उपशहर प्रमुख संदीप दातरंगे यांनी केले.

यावेळी मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी लिंबू चमचा, बादलीत बॉल टाकणे, एक मिनिट शो, संगीत खुर्ची स्पर्धा व महिलांसाठी पाककला, संगीत खुर्ची,विडी वळवणे स्पर्धा घेण्यात आले. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आकर्षक असे बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात यांनी सांगितले की, विद्यार्थी मोबाईल पासून दूर होऊन मैदानी खेळांकडे वळावे या उद्देशाने तसेच महिलांना रोजच्या कामाच्या व्यापातून मनोरंजन व्हावे, त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळण्यासाठी श्री एकदंत गणेश मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगून गणेश जयंती निमित्त राबविण्यात येत असलेले सामुदायिक विवाह, रक्तदान शिबिर, आरोग्य औषध वाटप शिबिर, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, शालेय विद्यार्थ्यांना दप्तर वाटप, सांस्कृतिक कार्यक्रम बत्काम्मा, डान्स स्पर्धा, हनुमान चालिसा पठण, बाल मेळावा तसेच महापुरुषांच्या जयंतीनिमीत्त सामाजिक उपक्रम या सर्व उपक्रमांची व कार्यक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशन सुंकी, विनीत इराबत्तीन यांनी केले तर आभार प्रदर्शन ओंकार बुरगुल व यश मंचे, अमर सादुल यांनी केले. गणेश उत्सव यशस्वीतेसाठी श्री एकदंत गणेश मंडळ व श्री एकदंत महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी परिसरातील महिला, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.