अधिकारी, कर्मचारी निवडणूक प्रचारात सहभागी झाल्यास थेट करणार बडतर्फ !

अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीच्या राजकीय कार्यक्रम व प्रचारात महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभागी होऊ नये. अधिकारी किंवा कर्मचारी निवडणूक प्रचारात सहभागी असल्याचे आढळल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ५६ नुसार कोणतीही नोटीस न देता फौजदारी स्वरूपाची व महानगरपालिकेच्या सेवेतून बडतर्फीची कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे. आयुक्त डांगे यांनी याबाबत सर्व विभागप्रमुख व अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना आदेश काढले आहेत. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ मधील कलम ५ नुसार कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याला, कोणत्याही राजकीय पक्ष किंवा राजकारणात भाग घेणाऱ्या कोणत्याही संघटनेचा सदस्य होता येणार नाही किंवा त्याच्याशी अन्य प्रकारे संबंध ठेवता येणार नाही, अशी तरतूद आहे. कोणताही शासकीय कर्मचारी कोणत्याही विधानसभेच्या किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या निवडणूकीत प्रचार करू शकणार नाही किंवा हस्तक्षेप करू शकणार नाही, त्यात भाग घेऊ शकणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अधिकारी किंवा कर्मचारी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभागी असल्यास त्याला महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ५६ नुसार कोणतीही नोटीस न देता फौजदारी स्वरूपाची महानगरपालिकेच्या व सेवेतून बडतर्फीची कारवाई केली जाईल, असे आयुक्त डांगे यांनी आदेशात म्हटले आहे.