निवडणूक विषयक पथक प्रमुखांचा अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी घेतला आढावा

मतदान केंद्रांवर पुरविण्यात येणाऱ्या सुविधांचे सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना

शिर्डी, १२ एप्रिल (उमाका) – आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या विविध जिल्हास्तरीय पथक प्रमुख (नोडल अधिकारी) यांची आज राहाता येथे आढावा बैठक झाली. अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी (शिर्डी लोकसभा मतदार संघ) यांनी आज नोडल अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. प्रत्येक पथकाने निवडणुकीच्या अनुषंगाने दिलेल्या जबाबदारी चोखपणे पार पाडावेत. तसेच भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार मतदारांना मतदान केंद्रांवर पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबत सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि तहसीलदार यांनी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना ही त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी अपर पोलीस अधिक्षक वैभव कालुबरगे, राहाता सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांतधिकारी माणिक आहेर, अकोले सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रामदास जगताप, संगमनेर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांतधिकारी शैलेश हिंगे, श्रीरामपूर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांतधिकारी किरण सावंत, कोपरगाव सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी बालाजी क्षिरसागर यांच्यासह तहसीलदार, नोडल अधिकारी उपस्थित होते. पहिल्या टप्प्यात निवडणूक खर्च, नामनिर्देशनपत्र, कायदा व सुव्यवस्था, विविध अॅप्लिकेशन्स आणि सायबर सुरक्षा, वाहतूक व्यवस्था, पोस्टल बॅलेट, भरारी पथके आदी बाबींसाठी नियुक्त पथक प्रमुखांचा आढावा घेण्यात आला.

आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी भरारी पथके, स्थायी पथके आणि व्हिडीओ सर्व्हीलंस टीम तैनात करण्यात आल्या आहेत. या सर्व पथकांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडावी. आदर्श आचारसंहिता कालावधीत अवैध मद्यविक्री किंवा वाहतूक, रोकड, अंमलीपदार्थ वाहतूक होत असल्यास भरारी पथके, स्थायी पथके, तसेच संबंधित विभागांनी गठीत केल्या पथकांनी त्वरित कार्यवाही करून त्याबाबतचा अहवाल संबंधित अधिकाऱ्यांना सादर करावा. आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी तालुकास्तरीय नोडल अधिकाऱ्यांनी दक्ष राहून काम करावे. जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी आदर्श आचारसंहिता भंग झाल्यास त्याबाबत तातडीने नियमानुसार कार्यवाही करावी.

निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व पथकांची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे या पथकांचे प्रमुख आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देश आणि नियमांनुसार कार्यवाही करणे आवश्यक आहे. यामध्ये कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी सर्व पथक प्रमुखांनी आपापल्या अधिनस्त अधिकारी, कर्मचारी यांना मार्गदर्शन करावे. तसेच सर्व पथकांनी एकमेकांशी समन्वय ठेवून निवडणूक विषयक कामकाज पार पाडावे, अशा सूचनाही श्री.कोळेकर यांनी यावेळी दिल्या.

मतदान केंद्रांवर पाळणाघर, मेडीकल कीट, ओआरएस, सावलीची पुरेशी व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. दिव्यांग मतदार, वयोवृद्ध मतदारांसह इतरही मतदारांना मतदान केंद्रांवर सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना भारत निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. तसेच प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदानादिवशी फलक लावून आवश्यक माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्यासाठी सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि तहसीलदार यांनी योग्य नियोजन करावे. दिव्यांग मतदारांची मतदार केंद्रनिहाय संख्या लक्षात घेवून त्याठिकाणी व्हील चेअर, वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, असे अपर जिल्हाधिकारी श्री.कोळेकर यांनी सांगितले. भरारी पथकांद्वारे करण्यात येणारी कार्यवाही, क्षेत्रीय अधिकारी आणि इतर पथकांचे प्रशिक्षण, मतदान यंत्र सुरक्षा कक्ष, वाहतूक व्यवस्था, आदी बाबींचा यावेळी आढावा घेण्यात आला.