ईव्हीएम पडताळणीसाठी वाढले अर्ज; थोरात, लंके, शिंदे यांच्याकडूनही आज अर्ज दाखल!
अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज करणाऱ्या उमदेवारांची संख्या वाढत आहे. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, कर्जत- जामखेडमधील भाजपचे उमेदवार, माजी मंत्री राम शिंदे आणि पारनेर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) उमेदवार राणी लंके यांनी आज (ता. २८) ईव्हीएम मशिन पडताळणीचे शुल्क भरून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे अर्ज केले आहेत. थोरात यांनी संगमनेर मतदारसंघातील घुलेवाडी, वडगाव पान, राजापूर, जवळे कडलक, धांदरफळ, साकुर, निमोण, चांडेवाडी या मतदान केंद्रांवरील ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केला आहे. त्यासाठी ४० हजार रुपये रक्कम व १८ टक्के जीएसटीसह शुल्क भरले आहे.
पारनेर मतदारसंघातील दोन नंबरचे उमेदवार राणी लंके यांनी देखील १८ मतदान केंद्रांवरील ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केला आहे. त्यासाठी त्यांनी ८ लाख ४९ हजार ८०० रुपयांचे शुल्क भरले आहे. नागरपूरवाडी, वनकुटे, पठारवाडी, सुतारवाडी, भाळवणी, सुपे, वाळवणे, निघोज, वाडेगव्हाण (ता. पारनेर), वडगाव गुप्ता, निंबळक (ता. नगर) या मतदान केंद्रांचा समावेश आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार प्रा. राम शिंदे यांनी ईव्हीएम पडताळणीची मागणी केली आहे. कर्जत-जामखेडमधील १७ मतदान केंद्रावरील पडताळणीसाठी ८ लाख २ हजार ४०० रुपयांचे शुल्क भरले. फक्राबाद, अरणगाव, कोल्हेवाडी, साकत, राजेवाडी, पाडळी, मुंगेवाडी, खर्डा, जामखेड शहर (ता. जामखेड), कर्जत शहर, पिंपळवाडी, बर्गेवाडी, परिटवाडी, म्हाळंगी, कापरेवाडी, कोरेगाव (ता. कर्जत) येथील मतदान केंद्रांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) राहुरीतील उमेदवार प्राजक्त तनपुरे आणि कोपरगावचे उमेदवार संदीप वर्षे यांनी बुधवारी (ता.२७) ईव्हीएम मशिन पडताळणीसाठी अर्ज केलेले आहेत. ईव्हीएम पडताळणीसाठी एका मशिनचे शुल्क हे ४७ हजार २०० रुपये आहे. निकाल लागल्यानंतर ४५ दिवसांनंतर पडताळणी करण्याची तरतूद आहे.