मुंबई :
सोनी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेतील मुख्य नायिका, म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडची मालिकेतून एक्झिट झाली आहे. निर्मिती संस्था आणि प्राजक्ता यांच्यामध्ये झालेल्या काही वादांमुळे तिनं मालिका सोडल्याचं समजतं.
चित्रीकरणासाठी सेटवर उशीरा येणं, चित्रीकरणासाठी ऐन वेळी नकार देणं, सुट्टीसाठी परीक्षा किंवा अन्य काही कारणं देणं अशा काही गोष्टींवरुन निर्माते आणि अभिनेत्री यांच्यात वादाची ठिणगी पडल्याचं कळतं. त्यातून प्राजक्ता मालिकेतून बाहेर पडली असून, तिच्या जागी अभिनेत्री वीणा जगताप दिसणार आहे.
मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल यांनी याबाबत सांगितलं, ‘स्क्रिप्ट १५ दिवस आधी हवं, चित्रीकरणासाठी इतकेच दिवस देईन या प्राजक्ताच्या अटी होत्या. त्या पूर्ण करणं शक्य नव्हतं. तसंच या सगळ्यात तिच्या आईचा बराच हस्तक्षेप असे. या सगळ्यामुळे आम्हाला अत्यंत मनस्ताप झालाय. असा त्रास इतर निर्मात्यांना होऊ नये ही इच्छा आहे. यापुढे प्राजक्ताच्या जागी अभिनेत्री वीणा जगताप आर्याच्या भूमिकेत दिसेल.असं त्या म्हणाल्यात.
याबाबत अभिनेत्री प्राजक्ताशी संपर्क साधला असता तिनं सांगितलं, ‘पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची कोविड चाचणी केली नसेल, तर त्यांच्याबरोबर प्रवास कसा करायचा, एवढाच माझा मुद्दा होता. त्यासाठी मला शिवीगाळ केली गेली. मला हे अत्यंत चुकीचं वाटलं. तरीही मी दीड महिना शूटिंग केलं. सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यावर, मालिका चांगली असूनही नाइलाजास्तव ३१ ऑक्टोबरपर्यंतच काम करेन, असं निर्माते आणि वाहिनीला मी सांगितलं आहे.