गौरी गणपती आले, पण आनंदाचा शिधा नाही आला?
अहमदनगर : राज्य सरकारने गौरी- गणपती सणासाठी आनंदाचा शिधा देण्याचे जाहीर केले होते. परंतु, गणपती बाप्पा येऊन पाच दिवस झाले आणि मंगळवारी गौरीचे आगमन झाले तरीही जिल्ह्यातील लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा मिळालेला नाही. त्यामुळे गरिबांनी सण कसा साजरा करायचा? असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. यावेळी आनंदाच्या शिध्यावर सहाऐवजी चार वस्तू लाभार्थ्यांना मिळणार आहेत. जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेचे ७ लाख २४ हजार ५२० शिधापत्रिकाधारक असून, २९ लाख ३६ हजार ७०७ लाभार्थी आहेत. गौरी गणपती सणांसाठी यंदा ६ लाख ५४ हजार ५४४ संच मंजूर झाले होते. ई-पॉस प्रणालीद्वारे शिधा वाटप करण्यात येणार आहे. २०२२ च्या दिवाळीपासून राज्य सरकारने आनंदाचा शिधा देण्यास सुरुवात केली होती. यात रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर तेल या चार वस्तूंचा संच १०० रुपयांत देण्यात आला होता. यानंतर रामजन्मभूमी सोहळा व शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेल्या शिध्यामध्ये मैदा व पोह्यांचा समावेश करण्यात आला होता. मैदा व पोहे या दोन वस्तूंत वाढ करताना अन्य रवा व चणाडाळ या दोन वस्तूंचे वजन एक किलोवरून अर्धा किलोवर घटविले. मात्र, आता पुन्हा वस्तूंची संख्या सहावरून चार करण्यात आली आहे.