नेप्ती मधील मागासवर्गीय, आदिवासी, भिल्ल समाजातील कुटुंबीयांना जागा देऊन घरकुल मंजूर करा

एकलव्य संघटनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

दोन पिढ्यांपासून निवाऱ्यापासून वंचित असल्याचा आरोप

नगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथे पिढ्यानपिढ्या राहत असलेल्या मागासवर्गीय, आदिवासी, भिल्ल समाजाच्या कुटुंबीयांना घरकुल देण्याची मागणी एकलव्य संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन संघटनेचे राज्य संघटक मोहन गोलवड व संघटिका वैजयंता गोलवाड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. याप्रसंगी शिवाजी माळी, पितांबर माळी, अंकुश माळी, एकनाथ माळी, किशन माळी, रंगनाथ माळी, राजू माळी, रावसाहेब माळी, रावसाहेब मोरे, गुलाब बर्डे आदींसह नेप्ती येथील मागासवर्गीय, आदिवासी, भिल्ल समाजबांधव उपस्थित होते.
मागासवर्गीय, आदिवासी, भिल्ल समाज नेप्ती गावात मागील दोन पिढ्यांपासून वास्तव्यास आहे. त्यांच्याकडे स्वतःचे घरदार व जमीन नाही. सर्वांचा उदरनिर्वाह हात मजुरीवर आहे. वेळच्यावेळी कामधंदा मिळत नसल्याने व कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने स्वतःसाठी घर, जमीन विकत घेता येत नाही. घरात कोणीही सरकारी किंवा खाजगी नोकरीवर नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
शासनाने आदिवासींसाठी जागा, घरकुल देण्यासाठी सवलती जाहीर केलेले आहेत. परंतु हा वर्ग अशिक्षित असल्याने आजपर्यंत शासनाच्या सवलतींपासून वंचित राहिला आहे. नेप्ती गावठाणातून प्रत्येकास जागा मंजूर होऊन प्रत्येकाला घरकुल मंजूर करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.
गावगुंडामुळे न्याय मिळत नाही. स्वतःचे घर नसल्याने अक्षरश: ऊन, वारा, पाऊस, थंडी याचा त्रास सहन करुन उघड्यावरचे जीवन जगावे लागत आहे. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य राहत असलेल्या सरकारी जागेवरुन वेगवेगळे कारणे दाखवून खाली करण्यास लावत आहे. तर ज्यांना घरे त्यांना घरकुल मंजूर केली जातात व वंचितांना घरांपासून लांब ठेवले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.