विडी कामगारांना काम द्या, नाहीतर आर्थिक मदत द्या ; हातावर पोट असलेल्या विडी कामगारांना पंधराशे रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी

लालबावटा विडी कामगार युनियन आयटक व इंटकचे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यात 1 मे पर्यंत संचारबंदी घोषित करून पंधरा दिवसाच्या लॉकडाउन काळात विडी कामगारांना आर्थिक मदत द्यावी, अन्यथा विडी कामगारांचा रोजगार सुरु ठेवण्यासाठी विडी कारखान्यांना घरखेप सुरु ठेवण्याची मागणी लालबावटा विडी कामगार युनियन आयटक व विडी कामगार युनियन इंटकच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

कुटुंबाच्या उदरनिर्वाहाच प्रश्‍न बिकट होत असल्याने विडी कामगारांना काम द्या नाहीतर आर्थिक मदत देण्याचे आवाहन प्रशासनास करण्यात आले आहे.

अन्यथा रस्त्यावर येऊन आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी आयटकचे जनरल सेक्रेटरी अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर, उपाध्यक्ष भारती न्यालपेल्ली, इंटकचे अध्यक्ष शंकरराव मंगलारप, सरोजनी दिकोंडा, विनायक मच्चा, कविता मच्चा, शारदा बोगा, कमलाबाई दोंता, लक्ष्मीबाई कोटा, ईश्‍वराबाई सुंकि आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंधरा दिवसाचे संचार बंदी पुकारून लॉकडाऊन केले आहे.

यात कामगारांना दिलासा दिला असून, कारखाने व उत्पादने बंद न ठेवता नियम व अटी नुसार उत्पादन सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

तर आर्थिकदृष्ट्या गरीब कामगारांना पंधराशे रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. विडी कामगार हे देखील आर्थिक दृष्ट्या दुर्बल व गरीब असून रोजंदारीवर काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात.

राज्य सरकारने पंधरा दिवसाचा लॉकडाऊन केला असल्याने विडी कामगारांना देखील जिल्हाधिकारी यांनी 15 दिवसासाठी नियोजन समितीच्या कोट्यामधून प्रत्येकी कामगारास दीड हजार रुपये अनुदान देण्याची मागणी विडी कामगार संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.

शहरात सुमारे तीन ते चार हजार विडी कामगार असून, त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय होणार आहे. विडी कारखान्यांना विडी कामगारा पर्यंत घरपोच विडी बनविण्यासाठी पाने, तंबाखूचा कच्चा माल पुरविल्यास त्यांचा रोजगार बुडणार नाही,

कारखान्यांनी विडी कामगारांना रोजंदारी रोख स्वरुपात द्यावी व पंधरा दिवसाचे सानुग्रह अनुदान देण्याची मागणी लालबावटा विडी कामगार युनियन आयटक व विडी कामगार युनियन इंटकच्या वतीने करण्यात आली आहे.