हवामान बदलांचा परिणाम म्हणून जगभरात उष्णतेच्या लाटांची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा फटका म्हणून उष्माघाताने जगभरात दरवर्षी दीड लाखहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. त्यातही धक्कादायक बाब म्हणजे या मृत्यूपैकी सुमारे 20% मृत्यू एकट्या भारतात होत असल्याचा निष्कर्ष एका संशोधनातून काढण्यात आला. ऑस्ट्रेलियाच्या मोनाश विद्यापीठाने इंग्लंडमधील एमसीसी रिसर्च नेटवर्कच्या साह्याने जगभरातील 43 देश आणि 750 ठिकाणांच्या कमाल तापमानाचा आणि तेथील मृत्यूंचा 1990 पासून ते पुढच्या 30 वर्षांचा म्हणजे 2019 पर्यंत अभ्यास केला. त्यानुसार, दरवर्षी जगात मृत्यू होणाऱ्या सुमारे 1.53 लाख लोकांपैकी सर्वाधिक वीस टक्के मृत्यू भारतात होतात. तर त्या पाठोपाठ चीन आणि रशियात उष्माघाताने मृत्यू होतात. याबाबतचे संशोधन पीएलओएस मेडिसिन या नियतकालिकेत प्रसिद्ध झाले आहे. उष्माघाताच्या वाढत्या प्रमाणात हवामान बदल, तापमान वाढ आणि औद्योगीकरणामुळे पर्यावरणाचे बिघडलेले संतुलन त्यास कारणीभूत असल्याचे संशोधकांनी त्यांच्या शोध प्रबंधात म्हटले आहे.