१ तासाच्या पावसाने माजवला शहरात हाहाकार!
अहमदनगर : नगर शहर व परिसराला सोमवारी रात्री परतीच्या पावसाने झोडपून काढले. नगर शहरात विजेच्या कडकडाटांसह सायंकाळी ६.५० वाजेच्या सुमारास सुरू झालेला पाऊस रात्री ८ वाजेपर्यंत सुरू होता. सुमारे ६० मिनिटांच्या पावसामुळे शहरातील प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले होते. दरम्यान २४,२५ व २६ सप्टेंबर दरम्यान नगर शहर व जिल्ह्यात पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी नगर शहराला पावसाने झोडपले. नगर शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली होती. शनिवार, रविवारीही हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला होता. सोमवारी मात्र शहरात विजेच्या कडकडाट्यांसह मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शहरातील दिल्ली गेट, माळीवाडा, सर्जेपुरा, प्रोफेसर कॉलनी, मध्यनगर सह उपनगरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. बहुतांशी तालुक्यांत ३०० ते ६६९ मिमी आतापर्यंत पाऊस झाला आहे. गेल्या २४ तासात नगर जिल्हात ४.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, नगर जिल्ह्यात २४,२५ व २६ सप्टेंबरला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सुरू झालेला हा पाऊस परतीचा असून, या पावसाचा लाभ रब्बी हंगामातील पिकांना फायदा होणार आहे. पावसामुळे मात्र शहरातील प्रमुख रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.