अहमदनगर : जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार, त्यांच्या टोळ्या तसेच 200हुन अधिक गुन्हे दाखल असलेल्या आरोपींचा बंदोबस्त करण्यासाठी, पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. शहर आणि जिल्ह्यातील 560 सराईत गुन्हेगार आणि त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची संपूर्ण माहिती संकलित करून, त्याचे हिस्ट्रीशीट तयार करण्यात आलेले आहे. तसेच दोन पेक्षा अधिक गुन्हे असलेल्या, जिल्ह्यातील 5480 आरोपींची यादी तयार करण्यात आली असून वाढत्या चोऱ्या, दरोडे आणि संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी ही कार्यवाही केली आहे. टू प्लसची प्रभावी अंमलबजावणी करत गुन्हेगारांवर वॉच ठेवण्यात येत आहे. पोलिसांनी तयार केलेल्या या हिस्ट्रीशीटचा पोलीस तपासात मोठा फायदा होत आहे. असे असले तरीही जिल्ह्यात दरोडे आणि जबरी चोरीच्या गुन्हात वाढ होताना दिसते. या संदर्भातील काही सराईत गुन्हेगारांना अटक झाली असली तरी, अनेक गुन्हेगार अजूनही हाती लागलेले नाहीत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत अनेक गुन्हेगार आपले गुन्हे करत असतात. आता याच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पोलीसही गुन्हेगारांना आपल्या आटोक्यात आणण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत. तयार करण्यात आलेल्या गुन्हेगारांच्या हिस्ट्रीशीटमध्ये सराईत गुन्हेगार त्याने केलेले गुन्हे, त्याच्याशी संबंधित माहिती समाविष्ट असते. जसे की, गुन्हेगाराचे मूळ नाव, त्यांनी वापरलेली टोपण नावे, त्यांचे फोटो, फिंगरप्रिंट, त्याने आजपर्यंत केलेल्या गुन्ह्यांची माहिती, त्याचे नातेवाईक, त्यांच्या साथीदारांची माहिती, तपासात समोर आलेले ठाव ठिकाणी, त्यांचे संपर्क क्रमांक अशी इत्यंभूत माहिती या हिस्ट्रीशीट मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.आधुनिक तंत्रज्ञानाच्या या जमान्यात या तंत्राचा योग्य पद्धतीने वापर कोण करतो? हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडलेला आहे.
Next Post