HMPV विषाणू चिंतेचे कारण नाही, नागरिकांनी दक्षता घ्यावी!

अहिल्यानगर : चीनमध्ये मानवी मेटान्यूमो व्हायरसचा (एचएमपीव्ही) उद्रेक झाल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत एचएमपीव्हीचा एकही रुग्ण आढळलेला नाही. चीनमधून आलेल्या या नवीन विषाणुमुळे चिंतेचे कारण नसले तरी, नागरिकांनी आवश्यक दक्षता घ्यावी. या प्रकरणी भितीचे वातावरण निर्माण करू नये, मनपाने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले

आरोग्य विभागाच्या सूचनेनंतर आयुक्त डांगे यांनी बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत. केंद्राच्या आरोग्य विभागाने ३ जानेवारी रोजी निवेदन प्रसिध्द केले आहे. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. वर्ष २०२३ च्या तुलनेत डिसेंबर २०२४ मध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. मात्र, खबरदारीचा भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये या संदर्भातील सूचनांचे पालन करावे, असे आवाहन आयुक्त डांगे यांनी केले आहे .

  • नागरिकांनी हे करावे :

  1.  आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका.
  2. साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवावेत.
  3. ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक असल्य ठिकाणांपासून दूर रहावे.
  4. भरपूर पाणी प्यावे आणि पौष्टिक अन्न खावे.
  5. संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन (व्हेंटीलेशन) होईल, याची दक्षता घ्यावी.
  • नागरिकांनी हे करू नये :

  1. हस्तांदोलन करू नये. 
  2. टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर करू नये.
  3. आजारी लोकांशी जवळचा संपर्क टाळावा.
  4. डोळे, नाक आणि तोडाला वारंवार स्पर्श करणे टाळावे.
  5. सार्वजनिक ठिकाणी धुंकू नये.
  6. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेऊ नये.