हुंड्यासाठी छळ करुन नवविवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केले, पाच निर्दोष
नगर- जळके, ता. नेवारता येथे दि. 25/01/2017 रोजी फिर्यादीची मयत मुलगी वय वर्ष 22 हिचे लग्न दिड वर्षापुर्वी आरोपी क्र. 1 संभाजी रामदास नजन यांचेशी झाले होते. लग्नामध्ये हुंडा म्हणून 2,50,000/- रुपये देण्याचे ठरले होते. त्यावेळी फिर्यादीने 1,00,000/- रुपये आरोपींना दिले होते. परंतू उर्वरीत रक्कम हि फिर्यादीची परिस्थिती हलाखीची असल्याने सासरच्या लोकांना वेळेत देऊ शकले नाहीत. याचा राग मनात धरुन आरोपी नंबर 1. संभाजी रामदास नजन (पती) याने मयतास एक दोन वेळेस मारहाण केली व आरोपी नंबर 2 गणेश रामदास नजन (दिर), 3. निर्मला उर्फ उष गणेश नजरू (जाव) यांनी मयतास वारंवार घालून पाडून बोलून शिवीगाळ केली तसेच आरोपी नंबर 4 गयाबाई रामदास नजन (सासू), आरोपी नंबर 5 रामदास जनार्धन नजन (सासरा) यांनी तिला वेळोवेळी उपाशी ठवून तिच्याकडे व तिच्या लहान मुलीकडे दुर्लक्ष केले. सर्व आरोपींनी मयत हिला मानसिक व शारिरीक त्रास देऊन विषारी औषध घेण्यास प्रवृत्त केले तसेच मयताने घेतलेल्या औषधाची बाटली नष्ट करुन पुरावा नष्ट केला म्हणून यातील सर्व पाचही आरोपींच्या विरुध्द फिर्यादीच्या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी सर्व आरोपी राहणार जळका, ता. नेवासा यांचे विरुध्द भा.दं. वि. कलम 304 (ब), 498 (अ), 323, 504, 506, 201, 34 अन्वये गुन्हा दाखल केला असता, त्याची चौकशी नेवासा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. 2 श्री. हरिभाऊ वाघमारे यांचे समोर होऊन त्यात सर्व पाचही आरोपींची नुकतीच निर्दोष मुक्तता करण्यात आली. सर्व आरोपींतर्फे अहमदनगर येथील जेष्ट विधिज्ञ अॅड. सतिशचंद्र वि. सुद्रीक यांनी काम पाहिले.
याबाबत आरोपपत्राप्रमाणे थोडक्यात हकीगत अशी की, मयत हि धामोरी, ता. नेवासा येथील तर तिचा विवाह आरोपी नंबर 1 संभाजी, रा. जळका, ता. नेवासा यांचे सोबत झाला होता. लग्नात रुपये 2,50,000/- हुंडा ठरला होता. पैकी 1,00,000/- रुपये देणे बाकी होते. त्यावरुन वरील पाचही आरोपी तिचा मानसिक व शारिरीक छळ करत असत. तसेच मोटार सायकलसाठी रुपये 50,000/- मागत व ते देण्यासाठी तिचा मानसिक व शारिरीक छळ करीत असत. दिवाळीच्या दरम्यान मयत हि माहेरी निघुन गेली होती. परंतू तिचा नंदावा व दोन नणंदा यांनी तिला चांगले वागवणेची हमी दिल्याने त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून तिला नांदण्यास पाठविण्यात आले. तरीपण मयत हि असलेल्या छळाबद्दल फोनवरुन माहेरच्यांना सांगत असे. दि. 25/01/2017 रोजी फिर्यादी यांना मयतास तिने विष पिलेवरुन नगरच्या सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले असल्याचे कळविले. त्याप्रमाणे मयताचा नातेवाईक सरकारी दवाखाना नगर येथे गेले असता, आरोपी हे मयतास दवाखन्यात सोडून तेथून निघुन गेलेचे सांगितले. तसेच तिचे अंत्यविधीस पण आरोपीपैकी कोणीही हजर नव्हते. अशास्वरुपाचा पुरावा न्यायालयात सादर केला होता. परंतू उलट तपासातून सदरचा मृत्यु हा नैसर्गिक असून आरोपींना त्रास देण्यासाठी खोटी फिर्याद देण्यात आली. असा बचाव घेण्यात आला. तसेच आरोपीकडे दोन मोटार सायकली आहेत. त्यामुळे मोटार सायकलसाठी रुपये 50,000/- मागणेचे कारणच नाही. हुंडयाच्या रकमेत तफावत आहे या बाबींकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले. त्यामुळे आरोपींनी कोणतीही पैशाची मागणी केली नाही, तसेच मयताचा मृत्यु हा नैसर्गिक आहे. या बाबी ग्राहय धरण्यात येऊन सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सर्व आरोपींतर्फे अॅड. सतिशचंद्र वि. सुद्रीक यांनी काम पाहिले.