बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या तपासासाठी पोलिस पथक अहमदनगर जिल्हा रुग्णालयात दाखल

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र पोलिसांच्या ताब्यात

अहमदनगरच्या बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणाचा तपास करण्यासाठी तोफखाना पोलिसांचे पथक सोमवारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. जिल्हा रुग्णालयाने वितरित केलेले बनावट प्रमाणपत्र पोलिसांनी ताब्यात घेतले असून, ही प्रक्रिया समजून घेतली. यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. येथील जिल्हा रुग्णालयात लॉगिन आयडीचा वापर करून चौघांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढली होती. या प्रकरणी या चौघांसह जिल्हा रुग्णालयातील इतर दोन अशा सहा जणांवर गुन्हा दाखल झाला होता. सदर बनावट दिव्यांग प्रमाणपत्र गुन्ह्याचे तपासी अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक शैलेश पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचा तपास हाती घेतला आहे. त्यांनी सोमवारी जिल्हा रुग्णालयात जाऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्राथमिक चौकशी केली. दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी दाखल झालेल्या तपासाच्या अनुषंगाने चौकशी करण्यासाठी सोमवारी जिल्हा रुग्णालयात जाऊन पाहिती घेतली आहे. तसेच चार बनावट दिव्यांग प्रमाणपत्रही ताब्यात घेण्यात आले आहेत.पोलिसांनी माहिती घेतली असून, सागर भानुदास केकान, प्रसाद संजय बडे, सुदर्शन शंकर बडे, गणेश रघुनाथ पाखरे, अशा चार जणांची ऑनलाइन पद्धतीने दिलेले बनावट दिव्यांग प्रमाणपत्र ताब्यात घेण्यात आले आहेत. हे प्रमाणपत्र कसे वितरित करण्यात येतात, दिव्यांगांची तपासणी कोण करते, यादृष्टीनेही पोलिस तपास सुरू केला आहे. पोलिसांनी तपासासाठीची आवश्यक माहिती जिल्हा रुग्णालयाकडून मागविली होती, तसे पत्रही रुग्णालय व्यवस्थापनाला दिले होते. परंतु, जिल्हा रुग्णालयाकडून पुरेशी माहिती प्राप्त झाली नाही. त्यामुळे पोलिसांनी रुग्णालयात जाऊन तपासाला सुरुवात केली आहे. याप्रकरणी रुग्णालयातील योगेश बनकर व गणेश गोत्राळ, अशा दोन जणांवर संशय आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून हे दोघे फरार झाले आहेत. त्यांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. तसेच या प्रकरणात आणखी कोण कोण सहभागी आहे, याचाही शोध घेण्यात येत आहे.