कांद्याच्या भावात प्रतिक्विंटल मागे शंभर ते दोनशे रुपयांची घसरण
नगर : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गावरान कांद्याची आवक सुरू आहे. मागील काही दिवसात कांद्याला प्रति क्विंटल तीन हजार तीनशे रुपयांवर बाजार भाव मिळत होते. आठवडाभरापासून या दरात क्विंटलमागे शंभर ते दोनशे रुपयांची घसरण झाली असून, सद्यस्थितीत कांद्याला प्रतिक्विंटल 2900 रुपयांचा भाव मिळत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. उत्पादित केलेल्या कांद्याला समाधानकारक भाव मिळत नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी आपला कांदा चाळीत भरला होता. परंतु मागील काही दिवसात कांद्याला चांगला भाव मिळाला. सुरुवात झाल्यानंतर शेतकऱ्यांनी चाळीत भरून ठेवलेला कांदा विक्रीसाठी बाजार समितीत आणला. सुरुवातीला कांद्याला चांगला भाव मिळाला होता. चार जुलैला वांबोरी बाजार समितीत प्रतिक्विंटल 3300 दराने कांदा विकला गेला. त्यानंतर 20 जुलैला हे भाव कमी होऊन 3100 ते 3200 पर्यंत घसरले. सोमवारी वांबोरी उप बाजारात दहा हजार 746 गोणी कांद्याचे आवक झाली होती. त्यात एक नंबर कांद्याला 2600 ते 3000 रुपये प्रतिक्विंटल चा भाव मिळाला होता.