अहिल्यानगर : ‘कौन बनेगा करोडपती‘ मधून बोलतोय, तुम्हाला २५ लाखांची लॉटरी लागली आहे, असे सांगत ठाणे येथील ठकाने अहिल्यानगर येथील एकाची एक लाख ३३ हजार २०० रुपयांची फसवणूक केली. दरम्यान, सायबर पोलिसांनी ठाणे येथे जाऊन या ठकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. फैसल ईकबाल मेमन (रा. मेमन मंजिल, पीर रोड, ठाणे) असे आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. नारायण अरुणे (रा. लक्ष्मी माता मंदिराजवळ, रामवाडी, सर्जेपुरा, अहिल्यानगर) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या फिर्यादीवरून सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. ‘मी कौन बनेगा करोडपती’मधून बोलतोय तुम्हाला २५ लाखांची लॉटरी लागली आहे, असे आमिष आरोपीने अरुणे यांना दाखविले. त्यानंतर त्यांचा विश्वास मिळविला.
हा प्रकार २० ऑगस्ट २०२१ ते १० मार्च २०२२ या कालावधीत घडला. लॉटरीचे पैसे घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रोसेसिंग फीच्या नावाखाली आरोपीने फोन पेद्वारे ऑनलाईन पैसे पाठविण्यास भाग पाडले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने सायबर पोलिस ठाणे गाठले. सायबर पोलिसांनी आरोपीचा मोबाईल नंबर, बँक अकांऊटवरुन गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण केले. ठाणे येथून या आरोपीला अटक केली. पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक मोरेश्वर पेंदाम, उपनिरीक्षक योगेश चाहेर, पोलिस अंमलदार अभिजित अरकल, मल्लिकार्जुन बनकर, उमेश खेडकर, कारखेले, अरुण सांगळे, सविता खताळ, दीपाली घोडके यांनी ही कारवाई केली .
आमिषाला बळी पडू नका :
‘कौन बनेगा करोडपती’ मधून बोलतोय, आपल्याला लॉटरी लागली आहे, क्रेडिट कार्ड ॲक्टिव्हेशन करुन देतो, ऑनलाईन केवायसी अपडेट करुन देतो, पेट्रोल पंप एजन्सी देतो, ट्रेडिंग ॲप डाऊनलोड करुन जास्त प्रमाणामध्ये परतावा देतो, अशा वेगवेगळ्या अमिषाला बळी पडू नये, प्रत्येक अनोळखी व्यक्तीशी आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्यावी, तसेच कोणत्याही प्रकारे आर्थिक फसवणूक झाल्यास तत्काळ सायबर क्राईम पोर्टलच्या १९३० या हेल्पलाईन नंबरवर तक्रार करावी, असे आवाहन सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांनी केले आहे .