नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील ज्ञानसाधना बहुउद्देशीय व सेवाभावी संस्था संचलित लंडन किड्स प्री स्कूलची शैक्षणिक सहल आनंदबन येथे नेण्यात आली होती. एक दिवसीय सहलीत विद्यार्थ्यांनी निसर्गरम्य परिसराला भेट देवून सहलीचा मनमुराद आनंद लुटला.
शाळेच्या प्राचार्या रुचिता जमदाडे म्हणाल्या की, चार ते सहा या वयोगटातील मुलांची सहल जामखेड रोडवरील आनंदबन या ठिकाणी घेऊन आलो असता, मोठ्या उत्साहात चिमुकल्यांचे ढोल ताशा वाजून स्वागत करण्यात आले. निसर्गमय परिसराची पहाणी करुन परिसरातील विविध गोष्टींची माहिती त्यांना देण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष निसर्गरम्य परिसराची भेट घडविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुलांनी रेन डान्स, वॉटर पार्क, बैलगाडा राईड, उंटावरून सवारी, रेल्वेची फेरी, मॅजिक शो, कटपुतली शो, बॉम्बे सर्कस, रस्सीखेच, उंचउडी अशा वेगवेगवेळ्या खेळ व उपक्रमांचा आनंद घेतला. सुंदर व प्रसन्न अशा वातावरणात मुलांचा आनंद द्विगुणीत झाला होता. विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला.
यावेळी आनंदबनचे संचालक मंगेश बेरड व अक्षय भळगट यांनी सहलीचे स्वागत करुन सोयी-सुविधांची माहिती दिली. सहल यशस्वी करण्यासाठी लंडन किड्सच्या शिक्षिका कल्याणी शिंदे, सुप्रिया मुळे, प्रतिभा साबळे, सपना साबळे, जयश्री साठे, ज्ञानसाधना गुरुकुलचे संचालक प्रा. प्रसाद जमदाडे, शबाना शेख, गोंदके, साबळे मावशी यांनी परिश्रम घेतले.