मद्यविक्री केंद्रांवर महिलांची नियुक्ती

केरळमध्ये 'बेव्हको'च्या केंद्रांवर ५० टक्के महिला

प्रदीर्घ सामाजिक कलंक बाजूला सारत केरळमध्ये मद्यविक्री केंद्रांवर ५० टक्के महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केरळ स्टेट बेव्हरेजेस कार्पोरेशन (बेव्हको) या मद्याची किरकोळ विक्री करणाऱ्या सरकारी संस्थेने हा निर्णय घेतला असून मद्यविक्री केंद्रांवर ५० टक्के महिला कर्मचारी नेमणारे केरळ पहिले राज्य ठरले आहे. एकूण लोकसंख्येपैकी निम्म्या महिला असणाऱ्या केरळने ५० टक्के महिला कर्मचाऱ्यांना नियुक्ती देत न्याय दिला आहे.सुरुवातीला ‘बेव्हको’चे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना मद्यविक्री केंद्रांवर काम करण्याबाबत भीती वाटत होती. मात्र, महिला कर्मचाऱ्यांनी आपल्याला कामाचा समान हक्क असल्याचा दावा करत न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. त्यानंतर, न्यायालयाच्या आदेशामुळे महिला कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला. सुरुवातीला महिलांना मद्यविक्री केंद्रांवर नोकरी करण्याची भीतीही वाटत होती. मात्र, उलट येथील नोकरी सुरक्षित असल्याचा अनुभवही त्यांना आला. त्यामुळे, त्यांच्या या नोकरीला विरोध करणाऱ्या कुटुंबीयांचा दृष्टिकोनही बदलला असून महिला कर्मचाऱ्यांना कुटुंबांकडून पाठिंबा मिळत आहे. ‘बेव्हको’च्या व्यवस्थापकीय संचालिका हर्षिता अट्टलुरी म्हणाल्या, की मद्यविक्री केंद्रांवर महिला कर्मचाऱ्यांची एकमेव समस्या म्हणजे कामाचे प्रदीर्घ तास. कोणत्याही कामात आव्हानांचा सामना करावाच लागतो. ग्राहकांनी गैरवर्तणूक केल्याची तक्रार आल्यास तत्काळ दखल घेऊन पोलिसांमार्फत कारवाई केली जाते. बेव्हकोप्रमाणे पोलिस खात्यातही महिला कर्मचाऱ्यांची प्रमाण वाढविल्यास पोलिसांची कार्यशैली बदलेल, असेही त्यांनी सांगितले. ‘बेव्हको’च्या कर्मचाऱ्यांना दररोज सकाळी दहा ते रात्री नऊपर्यंत काम करावे लागते. त्याचप्रमाणे, सरकारने जाहीर केलेल्या ‘ड्राय डे’ दिवशीच सुटी मिळते.