चक्क भिकारी व अल्पवयीन मुलांच्या नावावर उचलले लाखोंचे कर्ज.

नगर अर्बन बँक - बनावट सोने तारण घोटाळा.

 

ऋषिकेश राऊत 
अहमदनगर प्रतिनिधी 

नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील बनावट सोने तारण घोटाळा बँकेचे संचालक मंडळ, बँक मॅनेजर, बँक अधिकारी, कर्मचारी व गोल्ड व्हॅल्यूअर दहिवाळकर यांच्या संगनमतानेच झाला असून या प्रकरणातील बोगस कर्जदारांच्या थक्क करणाऱ्या एकेक सुरस कथा तपासा अंती समोर येत आहेत.

या प्रकरणी नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे १५९ कर्जदारांच्या विरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल झाल्यामुळे त्यांची अटक पूर्व जामीन मिळविण्यासाठी धावा धाव सुरू आहे. गोल्ड व्हॅल्यूअर दहिवाळकर याने काही दलालांना हाताशी धरून काही गरजू, गोरगरीब व निरक्षर लोकांना पैशाचे आमिष दाखवून तर कधी विविध शासकीय योजनेद्वारे आर्थिक मदत मिळवून देण्याच्या बहाण्याने जाळ्यात ओढले असावे अशी धक्कादायक माहिती, या प्रकरणातील कर्जदारांचे वकील अॅड. दिपक शामदिरे यांनी दिली.

या प्रकरणात बस स्टॅन्ड वर भीक मागून आपली उपजीविका भागविणाऱ्या गुलाब लाला शेख या वयोवृद्ध व्यक्तीचे आधारकार्ड, फोटो व इतर कागदपत्रे परस्पर वापरून त्याच्या नावावर ९२ हजार रुपयांचे कर्ज २०१७ साली उचलले असल्याचे निदर्शनास आले. त्याच्या विरुद्ध बँकेने फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदवला असून गुलाब शेख यांनी अटक पूर्व जामीन मिळविण्यासाठी नगरच्या न्यायालायत धाव घेतली आहे. त्याच बरोबर शेवगाव तालुक्यातील मजले शहर येथील असिफ अहमद पठाण या अवघ्या १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलाच्या नावावर देखील १ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज २०१७ साली उचलण्यात आले आहे. त्याच बरोबर शेवगाव तालुक्यातील मळेगाव येथील अमोल मच्छीन्द्र निकम यांच्या नावावरही गुन्हा दाखल झाला असून आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल जोंधळे यांनी अमोल निकम यांना हजर राहण्याबाबतचे समज पत्र शाखाधिकारी अनिल आहुजा यांच्या फिर्यादीवरून पाठविले आहे.

 

 

राजेंद्र पानसंबळ यांनी कर्जासाठी तारण ठेवलेल्या सोन्याच्या वजनापेक्षा जास्त वजनाची नोंद गोल्ड व्हॅल्यूअरने बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून केली असून पानसंबळ यांची काहीही चूक नसतांना बँकेने त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करून नोटीस पाठीवली आहे. त्याबाबत अॅड. दिपक शामदिरे यांनी त्यांची बाजू मांडून पानसंबळ यांना तात्पुरता जामीन मिळवून दिला आहे. नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेत बनावट सोने तारण कर्ज प्रकरणी गेल्या महिन्यात गोल्ड व्हॅल्यूअरसह १५९ कर्जदारांवर बँकेला फसविल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून हा गुन्हे तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी आलेला आहे.

त्यातील काही आरोपींचा शोधही आर्थिक गुन्हे शाखेने सुरू केला आहे. गुन्हा दाखल झाल्या नंतर यातील अनेकांनी अटक पूर्व जामीन मिळविण्यासाठी धावपळ केली असून अनेक निरपराध लोकांना दलालांनी गंडा घातल्याचे निदर्शनास येत आहे. त्यातील अनेक जण अत्यंत गरीब आहेत. काही ६० ते ७५ वयोगटातील जेष्ठ नागरिक आहेत तर ज्यांनी कधीच या बँकेचे तोंड देखील पाहिलेले नाही, अशा लोकांच्या नावावर बनावट सोने तारण ठेवून लाखो रुपयांचे कर्ज उकळण्यात आले आहे.

 

या प्रकरणातील गुन्हा हा गंभीरस्वरूपाचा असल्यामुळे अनेकांनी अटक पूर्व जामिनासाठी धाव घेतली. मात्र ज्या गोर गरीब लोकांकडे वकिलाची फी देण्या इतके सुद्धा पैसे नाहीत असे लोक हवालदिल झाले होते. त्यांच्या मदतीला अॅड. दिपक शामदिरे, अॅड. किरण जाधव व अॅड. शिवाजी कराळे ही वकील मंडळी धावून आली आहेत. अद्यापपर्यंत सुमारे ३० जणांचे अटक पूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केले आहेत.

सोने तारण ठेवून कर्ज काढलेल्या लोकांपैकी अनेकांचे सोने खरे आहे म्हणूनच ते बँकेचे हप्ते नियमितपणे भरीत आहेत. खोटे सोने तारण ठेवले असेल तर त्याचे हप्ते कोण भरणार ? अशी शंका उपस्थित केली जात असून १५९ कर्जदारांपैकी १५-१६ महिला व १३ जेष्ठ नागरिकांचे अर्ज अटक पूर्व जामीन मिळविण्यासाठी दाखल करण्यात आले असून काही लोकांवर दाखल झालेले चुकीचे एफ. आय. आर. रद्द करण्यासाठी उच्च न्यायालायत जाणार असल्याचेही अॅड. दिपक शामदिरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील बनावट सोने तारण कर्ज प्रकरणातील घोटाळा हा बँक क्षेत्रातील मोठा घोटाळा मानला जात असून राज्यभर त्याची चर्चा होत आहे. सदर गुन्हे दाखल होण्यापूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव शाखेसमोर तसेच नगर येथील बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर आंदोलन केले होते. या प्रकरणातील खरे गुन्हेगार शोधून काढून गोर गरीब, निरपराध लोकांची सुटका व्हावी यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण हेदेखील लोकशाही मार्गाने प्रयत्न करीत आहेत.