आमदार रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोकडून जमीन व्यवहारात फसवणूक!
कर्जतच्या शेतकऱ्याचा आरोप: ५२ लाखांचा धनादेश वटला नाही
आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोने भांडेवाडी (ता. कर्जत) गट क्रमांक ५१०/२ जमीन खरेदी प्रकरणी आर्थिक फसवणूक केली. या व्यवहारातील ५२ लाख रुपयांचा धनादेशही वटला नाही. त्यामुळे आजमितीस जमिनीचा मोबदला मिळाला नाही. या प्रकाराबाबत तालुका प्रशासनाकडे दाद मागितली. मात्र तेथेही दखल घेतली गेली नाही, असा आरोप दूरगाव (ता. कर्जत) येथील शेतकरी कुंडलिक जायभाय यांनी पत्रकार परिषदेत केला. जयाभाय यांनी रविवारी येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी ॲड. कृष्णा जायभाय उपस्थित होते. या सर्व प्रकाराच्या विरोधात कुंडलिक जायभाय यांनी १ ऑक्टोबरला कर्जत तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
◆ न्यायालयाच्या मनाई आदेशाकडेही दुर्लक्ष
◈भांडेवाडी ५१०/२ जागा विक्रीबाबत श्रीगोंदा येथील न्यायालयाचा मनाई आदेश आहे. याकडेही बारामती ॲग्रोने दुर्लक्ष केले आहे. ही बाब प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलिस प्रशासनास निदर्शनास आणून दिली. मात्र त्यांनी या बाबीकडे सपशेल डोळेझाक केली.
◈ प्रशासनास हाताशी धरत राजकीय बळाचा वापर करीत वरील क्षेत्रावर खोटी पीक नोंद लावून त्यास कंपाउंड टाकून बळकाविण्याचा प्रयत्न सुरू केला, असा आरोप कुंडलिक जायभाय यांनी केला आहे.