सरपंच-उपसरपंचाच्या मानधनात झाली दुप्पट वाढ!

अहमदनगर : राज्य सरकारने सरपंच व उपसरपंचांना मानधन वाढविण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील १३२२ ग्रामपंचायतींमधील अडीच हजार सरपंच व उपसरपंचांना याचा लाभ होणार आहे. गावाच्या लोकसंख्येनुसार ही वाढ केली असून, ज्या गावांची लोकसंख्या ८ हजारांहून अधिक आहे, अशा गावांच्या सरपंचांना १० हजार रुपये मानधन मिळणार आहे. सध्या सरपंचांना तीन, चार, आणि पाच हजार रुपये तर उपसरपंचांना एक, दीड आणि दोन हजार रुपये मानधन दरमहा मिळते. मंत्रिमंडळात झालेल्या निर्णयानुसार यापुढे सरपंचांना सहा, आठ आणि १० हजार रुपये, तर उपसरपंचांना दोन, तीन आणि चार हजार रुपये दरमहा मानधन मिळणार आहे. मानधन वाढ मिळण्यासाठी मागील काही वर्षांपासून सरपंच परिषद विविध ठिकाणी आंदोलन, मोर्चा यांच्या माध्यमातून लढा देत आहे. त्यांच्या या लढ्याला आता यश आले असून राज्य सरकारने मानधनात दुप्पट वाढ केली आहे.

❏ २५ टक्के खर्च ग्रामपंचायतीचा
सरपंच व उपसरपंच यांना देण्यात येणाऱ्या मानधनावरील खर्चापैकी ७५ टक्के रक्कम शासन देणार असून उर्वरित मानधनाची रक्कम संबंधित ग्रामपंचायत स्वनिधीमधून देण्यात येणार आहे. ही वाढ २४ सप्टेंबर २०२४ पासून लागू असणार आहे.