इंटरनेट गेमिंग डिसऑर्डर

मोबाईल गेमच्या आहारी जाऊन, पिपंरीच्या शाळकरी मुलाची चौदाव्या मजल्यावरून उडी

काही दिवसापूर्वी शाळकरी मुले मोबाईल गेमच्या आहारी जाऊन त्या गेममधे सांगितलेले टास्क पूर्ण करण्याच्या नादात स्वतःला दुखापत केल्याच्या अनेक घटना आपण पहिल्या आणि वाचल्या होत्या. त्यामध्ये काही मुलांचे जीवही गेले. या घटनांना काही दिवस उलटले असतानाच काल पुण्यात पिपंरीच्या एका पंधरा वर्षांच्या शाळकरी मुलाने या मोबाईल गेमच्या नादात चौदाव्या मजल्यावरून उडी मारली. आणि त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. आर्य श्रीराव असे या मुलाचे नाव असून तो इयत्ता १० वीत शिकत होता. आर्यच्या आईवडिलांच्या म्हणण्यानुसार आर्य हा अभ्यासात हुशार होता पण अलीकडे तो मोबाइल गेम खेळण्याच्या आहारी गेला होता.
अशा अनेक घटनांवर एक नजर टाकली तर हल्लीच्या शाळकरी मुलांना आणि तरुण पिढीला मोबाइल गेमचे लागलेले व्यसन याचे मूळ कारण असावे असे तज्ञाचे मत आहे. वैद्यकीय भाषेत मोबाईलवर गेम खेळण्याच्या या व्यसनाला इंटरनेट गेमिंग डिसऑर्डर असे म्हणतात. हा मानसिक आजार अनेक मुलांच्या आयुष्यावर विपरीत परिणाम करत आहे. त्यामध्ये मुलांच्या शारीरिक, मानसिक आरोग्याला जसा धोका आहे. तसाच तो कौटुंबिक जीवनावरही आघात करत आहे. कारण मोबाइल गेम खेळण्याच्या नादात मुले तासंतास एक जागीच बसून असतात, त्यामुळे हल्लीच्या मुलामध्ये स्थूलता मोठ्या प्रमाणावर दिसते. खाण्यापिण्याकडे, मैदानावर खेळण्याकडे आणि आपल्या छंदाकडे अशा मुलांचे पूर्ण दुर्लक्ष होते. परिणामी मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख हळू हळू खाली येतो. याशिवाय अशा मुलांना सगळ्यामध्ये मिसळणे, सामाजिक कार्यात किंवा कार्यक्रमात सहभागी होण्यात अनेक अडचणी येतात. थोडक्यात मोबाईल गेममध्ये मुलांना मिळणारे वातावरण आणि त्यांच्या भौतिक आयुष्यात त्यांच्या भोवती असलेल्या वातावरणात खूप फरक असल्याने अशा मुलांना समाजात वावरताना अनेक अडचणी येतात. या काही प्राथमिक लक्षणांवरून आपण आपली मुले इंटरनेट गेमिंग डिसॉर्डरने ग्रासलेली आहेत. हे जाणावे.
या आजारातून आपण आपल्या मुलाना सहज बाहेर काढू शकतो, त्यासाठी आपल्याला आधी मुलाशी प्रेमाने वागायला हवे आणि महत्वाचे म्हणजे मुलांना मोबाईलला एखादा चांगला ऑप्शन द्यायला हवा. कारण मुलाच्या हातातून थेट मोबाइल काढून घेतला तर अशा मुलांमध्ये या इंटरनेट गेमिंग डिसॉर्डरने कधी कधी खूप नैराश्य येण्याची शक्यता असते. तर कधी अशी मुले हिंसकही होतात. त्यामुळे मुलांना एक उत्तम ऑप्शन देणं गरजेचे आहे. त्यामध्ये मग एखादी कला शिकणं असेल किंवा मैदानात खेळणेही असू शकते. याशिवाय या आजारातून आपल्या मुलांची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी आपण मानसोपचार तज्ज्ञाची मदतही घेऊ शकतो. तेव्हा आपल्या भावी पिढीला इंटरनेट गेमिंग डिसॉर्डर या मानसिक विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आपणच प्रयत्न करायला हवेत.