देशातील चालकरहित पहिल्या मेट्रोला मोदींचा हिरवा कंदील  

दिल्ली : 

देशातील पहिली पूर्णपणे स्वयंचलित चालक विरहित मेट्रो ट्रेन सोमवारपासून सुरु झाली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानी दिल्लीत या प्रकल्पाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा कंदील दाखवला आहे.   दिल्ली मेट्रोच्या मॅजन्टा लाईनवर ही मेट्रो धावणार आहे.  यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील उपस्थित होते.

या प्रकल्पाबाबत बोलताना मोदी म्हणाले,  “माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात देशातील पहिला मेट्रो रेल्वे प्रकल्प दिल्लीत उभारण्यात आला. सन २०१४ मध्ये देशातील केवळ ५ शहरांमध्ये मेट्रो रेल्वे धावत होती.  आज १८ शहरांमध्ये मेट्रो रेल्वे धावत आहेत.   सन २०२५ पर्यंत देशातील २५ शहरांमध्ये आम्ही मेट्रो प्रकल्प वाढवणार आहोत.”

मेट्रोचा विस्तार करताना ‘मेक इन इंडिया’ मोहिम महत्वाची भूमिका बजावत असून यामुळे प्रकल्पांचा खर्च कमी झाला आहे.  परकिय चलनाचीही बचत झाली आहे. तसेच देशातील नागरिकांना अधिक रोजगारही उपलब्ध झाल्याचे ही मोदींनी यावेळी सांगितले आहे.

प्रधानांच्या हस्ते यावेळी  कॉमन मोबिलिटी कार्डचेही उद्घाटन करण्यात आले आहे.  देशाच्या आधुनिकीकरणासाठी हे महत्वाचे पाऊल असून तुम्ही कोणत्याही सार्वजनिक वाहनातून प्रवास करा, यासाठी हे एकच कार्ड तुम्हाला उपयोगी पडेल, असं मोदी यावेळी म्हणालेत.