विद्युत रोषणाईने उजळला मोहटादेवी मंदिराचा परिसर
शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त मोहटा देवी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण मंदिर व देवी गडाचा परिसर उजळून निघाला आहे. मोहटा देवी गडासह तालुक्यातील धामणगाव देवी, कोल्हार, तोंडोळी, भारजवाडी, खरवंडी, पाथर्डी शहर, तिसगाव, करंजी अशा विविध देवी मंदिरात गुरुवारपासून (३ ऑक्टोबर) नवरात्रोत्सवास सुरुवात होणार आहे. त्यामुळे मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मोहटा देवी गडासह विविध व्यावसायिकांनीही आपल्या दुकानांवर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. घटी बसणाऱ्या महिला देवस्थान समितीच्या भक्त निवासात दाखल होऊ लागल्या आहेत. उंच गडावर स्थान असल्याने परिसरातील १५-२० किमीपासूनच मंदिराची आकर्षक विद्युत रोषणाई दिसू लागते. पायी चालत येणाऱ्या भाविकांसाठी अनेक मंडळे, उद्योजक, भाविक सेवेकरी यांच्याकडून मोफत चहापाणी व फराळाचे स्टॉल लागले आहेत. दिवसा हिरवाईने नटलेला परिसर, तर सूर्यास्तानंतर नयनरम्य आकर्षक विद्युत रोषणाई भाविकांच्या मनाला सुखावणारी ठरत आहे. जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण आगळे-वेगळे व अत्यंत शिस्तप्रिय मंदिर म्हणून या मंदिराचा लौकिक सर्वत्र पोहोचला आहे. देवस्थान समितीचे सर्व कर्मचारी, विश्वस्त मंडळ, ग्रामस्थ, पदाधिकारी आदी यंत्रणा कार्यरत झाल्या आहेत.