महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 च्या सुधारित तारखेची घोषणा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केली आहे. येत्या 1 डिसेंबरला ही परीक्षा घेतली जाणार आहे. कृषी सेवेतील पदांचा समावेश या भरती प्रक्रियेत करावा. या उमेदवारांची मागणीलाही मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे 782 पदांच्या भरतीसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे.सर्व स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक सुरळीत पार पडत असताना 2024 मध्ये काही परीक्षांचे वेळापत्रक विस्कळीत झाले, महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षाबाबत ‘तारीख पे तारीख’ पडत होती. कधी तांत्रिक अडचणी तर कधी उमेदवारांची मागणीनुसार परीक्षेच्या तारखेत बदल केला जात होता. यापूर्वी विविध कारणांनी परीक्षेच्या जुलै ऑगस्टमधील नियोजित तारखा हुकल्यानंतर सुधारित वेळापत्रकाचे राज्यभरातील उमेदवारांना प्रतीक्षा होती. त्यातच कृषी सेवांतर्गत उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी द्यावा लागणारा वेळ, नव्याने अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या संख्येनुसार परीक्षेचे नियोजन यासह आगामी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता आणि निवडणुकीचा अंदाजित कार्यक्रम आदी बाबींचा विचार करून सुधारित तारीख ठरवली गेली आहे. या कारणांमुळे आता पूर्व परीक्षा थेट डिसेंबर मध्ये होणार आहे.परीक्षेच्या सुधारित तारखेची घोषणा झाल्याने शासकीय नोकर नोकरीचे स्वप्न पाहणारे अनेक उमेदवार जोरदार अभ्यासाला लागले आहेत.