अहमदनगर मध्ये रंगणार नाट्य संमेलन

भारतीय मराठी नाट्य परिषदेचं शतक महोत्सवी वर्ष

अहमदनगर: अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलननाट्य परिषदेच्या नाट्यसंमेलनासाठी विशेष बाब म्हणून ९ कोटी ८३ लाख रुपये मंजूर केलेले आहेत. या पैशाचा विनियोग देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं केला जाणार आहे. नाट्यसंमेलन आणि विविध भागातील कार्यक्रम अशा पद्धतीनं नाट्यसंमेलन करणार आहोत. सर्व विश्वस्तांचा प्रतिनिधी म्हणून मी इथं उपस्थित आहे. प्रशांत आणि त्यांच्या सर्व कार्यकारणीवर विश्वास आहे.’ असं उद्योगमंत्री आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचं १०० वं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या आयोजनाची माहिती देण्यासाठी वार्ताहर परिषदेचं आयोजन वांद्रे-कुर्ला संकुल इथं आज करण्यात आलं होतं.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचं शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. जब्ब्बर पटेल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून या संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आणि मुख्य निमंत्रक उदय सामंत आहेत. तंजावर इथं ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, नाट्य परिषदेचे पदाधिकारी आणि सदस्य यांच्या उपस्थितीत नाट्य संहिता पूजन आणि नटराज पूजन होणार आहे. यानंतर नाट्य संमेलनाच्या सोहळ्याची मुहूर्तमेढ कार्यक्रम
सांगली इथं दिनांक २९ डिसेंबर २०२३ ला होणार आहे.शतक महोत्सवी नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा दिनांक ५ जानेवारी २०२४ ला पुणे इथं सुरु होऊन समारोप मे २०२४ अखेर रत्नागिरी इथं संपन्न होणार आहे. उद्घाटन सोहळा ते समारोप या कालावधीत अहमदनगर, सोलापूर, बीड, लातूर, नागपूर आणि मुंबई येथे विभागीय नाट्य संमेलन संपन्न होणार आहे.
दिनांक ५ जानेवारी २०२४ ला शतक महोत्सवी नाट्य संमेलनाचा शुभारंभ पुणे इथं संपन्न होणार असून दिनांक ६ जानेवारी २०२४ ला पिंपरी-चिंचवड इथं नाट्य संमेलनाचा उद्घघाटन सोहळा संपन्न होणार आहे. तसंच दिनांक ७ जानेवारी २०२४ रोजी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध शाखा आणि कलावंत सहभागी होणार आहेत. त्यानंतर महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी संमेलनाचं आयोजन करण्यात येणार आहे. दिनांक २० आणि २१ जानेवारी २०२४ ला अहमदनगर, दिनांक २७ आणि २८ जानेवारी २०२४ सोलापूर, दिनांक ४ फेब्रुवारी २०२४ बीड, दिनांक १० आणि ११ फेब्रुवारी २०२४ लातूर, दिनांक १७ आणि १८ फेब्रुवारी २०२४ रोजी नागपूर, आणि मुंबई इथं नाट्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे.
१०० व्या नाट्य संमेलनानिमित्त विशेष उपक्रम म्हणून आणि जास्तीत जास्त कलावंतांना आपली कला सादर करण्याची संधी मिळावी, यासाठी नाट्य कलेचा जागर आयोजित करण्यात आला असून यात खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा (महोत्सव), बालनाट्य स्पर्धा (महोत्सव), नाट्य संगीत स्पर्धा (महोत्सव), एकपात्री स्पर्धा (महोत्सव), नाट्यछटा स्पर्धा (महोत्सव) आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी महाराष्ट्रातील विविध २२ केंद्रांवर जानेवारी २०२४ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत होणार असून निवडक एकांकिका, बालनाट्य, नाट्य संगीत, एकपात्री, नाट्यछटा उपांत्य फेरी नाशिक आणि सांगली इथं मार्च २०२४ ला संपन्न होणार आहे. उपांत्य फेरीतून निवडण्यात आलेल्या ९ एकांकिका आणि बालनाट्य तसंच नाट्य संगीत, एकपात्री, नाट्यछटा यांची अंतिम फेरी एप्रिल २०२४ मुंबईतल्या यशवंत नाट्य मंदिर इथं संपन्न होणार आहे.
एकांकिका आणि बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय एकांकिका आणि बालनाट्यसाठी अनुक्रमे रु. ११,०००/- रु. ७,०००/- व रु. ५,०००/- पारितोषिक देण्यात येणार असून अंतिम फेरीत या स्पर्धेसाठीच लिहिलेल्या आणि अंतिम फेरीत प्रथम आलेल्या एकांकिकेस रु. २,००,०००/- पारितोषिक देण्यात येणार आहे अथवा इतर एकांकिकेस प्रथम रु. १,००,०००/-, द्वितीय रु. ७५,०००/- तृतीय रु. ५०,०००/- आणि उत्तेजनार्थ २५,०००/- रोख, तसेच दिग्दर्शन/नेपथ्य/प्रकाश योजना/पार्श्वसंगीत/स्त्री अभिनय / पुरूष अभिनय ह्या साठी प्रत्येकी प्रथम द्वितीय आणि तृतीय साठी अनुक्रमे रू. १५,०००/-, रु. १०,०००/-, रु. ५,०००/- रोख देण्यात येणार आहेत. या एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सादर होणाऱ्या खास या स्पर्धेसाठी लिहिलेल्या नवीन एकांकिकांमधून तीन एकांकिका सर्वोत्कृष्ट लेखनाच्या पारितोषिकासाठी प्राथमिक फेरीतून निवडण्यात येतील. त्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देण्यात येईल.अंतिम फेरीत निवड झालेल्या नाट्य संगीत, एकपात्री, नाट्यछटातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय विजेत्यांना अनुक्रमे रू. ५०,०००/-, रु. ३५,०००/-, रु. २५,०००/-, आणि दोन विजेत्यांना प्रत्येकी उत्तेजनार्थ रू. १०,०००/- देण्यात येणार
आहेत.
सर्व सहभागी कलावंतांना सहभाग पत्र देण्यात येणार आहे. तसंच विजेत्यांना रोख रक्कम सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. अंतिम फेरीतील पहिल्या ३ विजेत्यांचे प्रयोग रत्नागिरी इथं होणाऱ्या नाट्य संमेलनाच्या समारोप समारंभात सादरीकरण होईल.
` १०० व्या नाट्य संमेलनाला रसिक आणि रंगकर्मीनी बहुसंख्येनं उपस्थित रहावं, असं आवाहन अखिल भारतीय मराठी 1 नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी केलं आहे.