निमगाव वाघात रंगला नगर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचा थरार
खो-खो, कबड्डी, गोळा फेक, धावणे स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
क्रीडा स्पर्धेतून विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी -पै. नाना डोंगरे
नगर (प्रतिनिधी)- युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथील श्री नवनाथ विद्यालयात नगर तालुकास्तरीय विविध क्रीडा स्पर्धा पार पडल्या. खो-खो, कबड्डी, गोळा फेक, धावणे या मैदानी स्पर्धेचा थरार रंगला होता. यामध्ये शालेय मुला-मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या खेळातील कौशल्याचे प्रदर्शन घडविले.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये मैदानी खेळाची आवड निर्माण होण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदीप डोंगरे, तेजस केदारी आदींसह शालेय शिक्षक उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये दिवसेंदिवस मैदानी खेळाचे महत्त्व कमी होत चालले आहे. विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणाबरोबरच खेळाकडे वळावे. क्रीडा स्पर्धेतून करिअर करण्याच्या विविध संधी उपलब्ध आहेत. शासकीय नोकरीसाठी खेळाडूंना जागा राखीव आहेत. बाल वयातच खेळाची गोडी निर्माण झाल्यास त्याचे आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्तम कांडेकर म्हणाले की, जीवनात खेळ आनंद निर्माण करतो. तर जीवनात विजय मिळवून संयमाने व पराभव झाल्यास खचून न जाता पुढे जाण्याचे गुण विकसीत करतात. प्रत्येक विद्यार्थ्यांने एकतरी मैदानी खेळ खेळण्याचे त्यांनी आवाहन केले.
नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी संकल्प शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेतील विजेते खेळाडू व संघ जिल्ह्यास्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत. नगर तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत मुलींचा संघ प्रथम- सरस्वती ग्रुप, द्वितीय- श्री नृसिंह संघ, तृतीय- नवनाथ संघ, कबड्डी मुलांचा संघ प्रथम- बिरोबा संघ, द्वितीय- शिव संघर्ष कबड्डी क्लब, गोळा फेक मुले प्रथम- ओमकार भुसारे, द्वितीय- ज्ञानेश्वर कराळे, तृतीय- प्रेम फलके, गोळा फेक मुली प्रथम- अपूर्वा कापसे, द्वितीय- आकांक्षा गायकवाड, तृतीय- पुनम जाधव, 100 मीटर धावणे मुले प्रथम- कृष्णा जाधव, द्वितीय- सार्थक वाबळे, तृतीय- ऋतुराज चौधरी, 100 मीटर धावणे मुली प्रथम- सिध्दी कापसे, द्वितीय- हेमलता बोडखे, तृतीय- मोहिनी वाघुले यांनी बक्षिसे पटकाविली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय शिक्षक व शिक्षकेतरांनी परिश्रम घेतले. स्पर्धेसाठी नेहरु युवा केंद्राचे लेखापाल सिध्दार्थ चव्हाण, रमेश गाडगे यांचे मार्गदर्शन लाभले.