24 जानेवारी पासून पुण्यात तीन दिवसीय निरंकारी संत समागमात मानवतेचा महासंगम.

नगर क्षेत्र व जिल्ह्यातून 10 हजार हून अधिक भाविकांचा सहभाग

नगर-  महाराष्ट्राचा 58 वा वार्षिक निरंकारी संत समागम पिंपरी, पुणे येथील मिलीटरी डेरी फार्मच्या सुमारे 400 एकर हून अधिक विशाल मैदानावर शुक्रवार दि.24 जानेवारी पासून तीन दिवसीय संत समागमाचे आयोजन करण्यात आले असून यात देशभरातील लाखो निरंकारी भक्तगण तसेच विदेशातील अनेक ठिकाणाहून ही मोठ्या संख्येने भाविक येणार असून मंडळाच्या अहमदनगर क्षेत्रामधील सहा जिल्ह्यातील अंदाजे दहा हजार हून अधिक भाविक- भक्तगण बुधवार पासून समागमासाठी रवाना होणार असल्याची माहिती मंडळाचे नगर  क्षेत्र प्रमुख हरीश खूबचंदानी यांनी दिली.
     समागमा विषयी अधिक माहिती देताना खूबचंदानी म्हणाले की समागमाच्या पहिल्या दिवशी सकाळी सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज व राजपिता रमितजी यांना सुसज्जित वाहन (रथामधून) शोभायात्राद्वारे मुख्य सत्संग पंडाल पर्यंत आणले जाईल यावेळी अनेकतेतून एकतेचे विहंगम दृश्य पाहण्यास मिळेल यात देशाच्या कानाकोपऱ्यातून पारंपारिक वेशभूषा धारण केलेले भक्तगण आपली कला सदगुरू समक्ष सादर करतील. सत्संग चा मुख्य कार्यक्रम तिन्ही दिवशी दुपारी दोन वाजता सुरू होईल ज्यात अनेक वक्ते, गीतकार, कवीजन, सद्गुरु आणि ईश्वरा प्रति आपल्या मनातील भावना व्यक्त करतील व तिन्ही दिवस सत्राच्या शेवटी रात्री नऊ वाजता सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांचे अमृततुल्य, मार्गदर्शनपर प्रवचन होतील. दरम्यान समागमच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात निरंकारी सेवादलाच्या महिला व पुरुष सदस्यांची भव्य अशी रॅली होईल यात सेवादल कवायती व सेवेप्रति नाटिका सादर करून सद्गुरूं चे आशीर्वाद प्राप्त करतील. समागमाच्या तिसऱ्या दिवशी सायंकाळच्या सत्रात बहुभाषिक कवी संमेलन पार पडेल.
   मागील एक महिन्यापासून महाराष्ट्रासह इतर राज्यातून निरंकारी भावीक ,भक्तगण तसेच सेवादल सदस्य आपल्या निष्काम सेवांच्या माध्यमातून समागम स्थळांना समतल व सुंदर बनविण्यासाठी त्यामधील प्रत्येक व्यवस्थेला अंतिम रूप देत समागम स्थळाला एक सुंदर नगरीच्या रूपात परिवर्तित केले आहे.
    समागमात सहभागी होणाऱ्या सर्व भक्तगणांसाठी व्यापक स्तरावर निवासी तंबू, लंगर, कॅन्टीन, दवाखाने, सुरक्षा व्यवस्था, पाणी, अत्यावश्यक सुविधांची यथोचित व्यवस्था करण्यात आली आहे. प्रकाशन स्टॉल्स, मुख्य आकर्षण असलेली ‘निरंकारी प्रदर्शनी’, ‘बाल प्रदर्शनी’ तयार केली आहेत.
    निरंकारी मिशनच्या वतीने मानवतेच्या या महामेळाव्यासाठी समस्त भाविक बंधू भगिनींना आदरपूर्वक आमंत्रित करण्यात येत आहे.त्यांनी या संत समागमात सहभागी होऊन आपले जीवन सार्थक करावे.