विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ऑपरेशन ढब्बू मकात्या लॉकडाऊनचे आवाहन

पीपल्स हेल्पलाइन आणि भारतीय जनसंसद करणार ढब्बूमकात्या लॉकडाऊन रेड गॅझेट प्रसिद्ध

नगर (प्रतिनिधी)- पीपल्स हेल्पलाइन आणि भारतीय जनसंसदेने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर 20 नोव्हेंबर अखेरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन ढब्बू मकात्या लॉकडाऊनचे आवाहन करुन नागरिकांना आग्रह धरला आहे. या पार्श्‍वभूमीवर रविवारी (दि.17 नोव्हेंबर) सकाळी 11 वाजता हुतात्मा स्मारकात ढब्बूमकात्या लॉकडाऊनचे रेड गॅझेट प्रसिद्ध केले जाणार असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.
भारतीय संविधानाचे कलम 51 (अ) अन्वये प्रत्येक भारतीयावर मूलभूत कर्तव्य ठेवण्यात आले आहे. परंतु लोकशाहीला मारक ढब्बूमकात्या प्रवृत्ती सर्वत्र पोसली गेली आहे. त्यामध्ये मतकोंबाड, ढब्बूमकात्या आणि पोटगी पत्रकार या तीन बाबी प्रकर्षाने पुढे आल्या असून, त्यांच्या माध्यमातून मतदार अक्कलमारी व्यापक केली आहे. त्यामुळे खऱ्या लोकशाहीला धोका निर्माण झाला असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
ऑफ दी पीपल, फॉर दी पीपल, बाय दी पीपल या अब्राहम लिंकन यांच्या लोकशाहीच्या व्याख्येला सत्तापेंढाऱ्यांनी  बाय दी पीपल म्हणजे लोकांना विकत घेणे हा जवळचा मार्ग शोधला आहे. लोकशाही उन्नत व्हावी म्हणून लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्तीसाठी संघटनेच्या वतीने आग्रह धरण्यात आला आहे.
भारतात मोठ्या प्रमाणात मतदार संविधानातील कलम 51 (अ) पायदळी तुडवून अल्प फायद्यासाठी सत्तापेंढाऱ्यांचे घर भरत आहेत आणि त्यांना मागच्या दाराने सत्तेमध्ये येण्यासाठी मदत करत आहेत. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घरकुल वंचित दाखवा आणि आपल्याला कळवा आणि त्याला त्वरित घर देतो! अशी जाहीर वल्गना केली. एकट्या नगर शहरात 20 हजार घरकुल वंचितांची यांची यादी पडून असून, एकाला देखील घर मिळालेले नाही. अशी वस्तुस्थिती असताना प्रधानमंत्री जनतेची मोठ्या प्रमाणात फसवणूक करत आहे. हीच मतदार अक्कलमारी असल्याचे ॲड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे. तर दिल्लीपासून गल्लीपर्यंत मतदारा अक्कलमारीने हातपाय पसरले आहेत. संघटनेने मतकोंबाड, ढब्बूमकात्या आणि पोटगी पत्रकार ओळखा आणि शेजाऱ्या कळवा ही मोहिम हाती घेतली असल्याचे म्हंटले आहे.
ढब्बूमकात्या लॉकडाऊनचे रेड गॅझेट प्रसिद्ध करण्यासाठी ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, ओम कदम, प्रकाश थोरात, जालिंदर बोरुडे, शाहीर कान्हू सुंबे, अशोक भोसले, वीर बहादूर प्रजापती, कैलास पठारे, सुधीर भद्रे, विठ्ठल सुरम आदी प्रयत्नशील आहेत.