पारनेर बाजार समितीचे ई पीक नोंदणी मार्गदर्शनपर चर्चासत्र संपन्न…

ई पिक पहाणी नोंदणी राज्य सरकारचा क्रांतीकारी उपक्रम महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

 

अहमदनगर   (संस्कृती रासने )

 

पारनेर:  ई पीक पाहणी नोंदणी हा राज्य सरकारचा क्रांतिकारक उपक्रम आहे.या उपक्रमामुळे राज्यातील शेतकरी अधिक सक्षम होतील असा विश्वास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांना शेतकऱ्यांविषयी, शेतीच्या प्रश्नांविषयी असणाऱ्या आस्थेची नेहमीच चर्चा होते.ई पीक नोंदणी प्रक्रियेविषयी शेतकऱ्यांमध्ये असणारा संभ्रम दूर करण्यासाठी गायकवाड यांचे सुरू असलेले प्रयत्न स्तुत्य असल्याचे मंत्री थोरात म्हणाले. सभापती प्रशांत गायकवाड यांनी वाळूंज फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या सहकार्याने दूरदृष्य प्रणालीद्वारे ई पीक पाहणी नोंदणी मार्गदर्शनपर चर्चासत्राचे आयोजन केले होते.या चर्चासत्रात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सहभागी होत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

 

हे ही पहा आणि चॅनेल सबस्क्राईब करा 

सभापती प्रशांत गायकवाड यांच्यासह ई पीक नोंदणी उपक्रमाचे राज्य समन्वयक, उपजिल्हाधिकारी रामदास जगताप, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष उदय शेळके, प्रांताधिकारी सुधाकर भोसले,तालुका कृषी अधिकारी विकास गायकवाड, कृषी सहायक शुभम काळे,तलाठी एस.यू.मांडगे आदिंनी चर्चासत्रात सहभागी होऊन इ पीक पाहणी नोंदणी बाबतची तांत्रिक माहिती दिली.तसेच शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. महसूलमंत्री थोरात म्हणाले की, माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सरकारने पीक पाहणी नोंदणीसाठी विशीष्ट प्रणाली (ॲप) विकसित केली आहे. शेतकऱ्यांसाठी ही नव्या युगाची सुरुवात आहे.या क्रांतिकारी निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होईल.शेतकरी खऱ्या अर्थाने सक्षम होणार आहेत.येत्या २ ऑक्टोबर पासून ऑनलाइन पद्धतीने सात-बारा उतारा व फेरफार मोफत देण्यात येणार असल्याचे मंत्री थोरात यांनी जाहीर केले.

 

 

सभापती प्रशांत गायकवाड म्हणाले की,आधारभुत किंमतीने शेतमाल खरेदी, विविध कृषी योजनांची अनुदाने,क्षेत्रवाढ,पीक विम्याचा लाभ,शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ई पीक नोंदणी आवश्यक असणार आहे.तसेच अद्ययावत पीक नोंदणी प्रणालीमुळे शेती विषयक निर्णय घेणे,शेतीपूरक योजना तयार करणे सरकारला सुलभ होणार आहे.त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने जाणीवपूर्वक ई पीक नोंदणी करावी.ई पीक नोंदणीत अडचणी आल्यास सरकारच्या (०२०)२५७१२७१२ अथवा वाळूंज फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या ९०२८०५५५३० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सभापती गायकवाड यांनी केले.चर्चासत्र यशस्वी होण्यासाठी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक, अधिकारी,तालुका विकास अधिकारी, जिल्ह्यातील सेवा संस्थांचे अध्यक्ष, सचिव यांनी सहकार्य केल्याबद्दल गायकवाड यांनी आभार मानले.